खजूर जास्त पौष्टिक की खारीक? जाणून घ्या काय आहेत फायदे…

रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा खजूर की भूक वाढवणारी खारीक जास्त पौष्टिक? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. आज आपण खजूर आणि खारीक या दोन्हींबाबत जाणून घेणार असून यात असणारे घटक, याचे फायदे काय आहेत हे देखील माहिती करून घेणार आहोत.

खजूर –

dates-new

बाजारामध्ये आपल्याला दोन प्रकारचा खजूर दिसतो. एक ओलसर आणि एक सुका. दोन्ही खजूर शरीरासाठी उत्तमच. कारण खजूरामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस व ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व, प्रथिने, खनिजे, तंतूमय पदार्थ आणि पिष्टमय पदार्थ हे सर्वच घटक असतात. याच्या सेवनामुळे शरीराला उर्जा मिळते. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास खजूर हे फळ मधुर पौष्टिक, बलवर्धक, श्रमहारक, तृप्तिदायक, पचनास जड आणि वीर्यवर्धक आहे.

काय आहेत फायदे?

– जाडी वाढवायची असल्यास हमखास खजूर खा. लहान मुलांना रोज खजूर दिल्याने ते धष्टपुष्ट होतात.
– आतड्यांचा त्रास असल्यास खजूराच्या सेवनामुळे तो कमी होण्यास मदत होते. यात असणाऱ्या घटकामुळे आम्लपित्ताचा त्रासही कमी होण्यास मदत मिळते.
– खजूराच्या सेवनामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
– नियमितपणे खारीक व गरम दूध घेतल्यास शक्ती वाढते. शरीरात नवीन रक्त निर्माण होते..
– खजुरात अँटी ऑक्सीडेंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. यामुळे चेहरा आणि शरीरावरील त्वचेवर तेज निर्माण होते. तसेच प्रतिकारशक्ती देखील वाढते.
— हाडांना मजबूत करण्यात खजूर महत्वाची भूमिका निभावते. यात फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम घटक मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे हाडे मजबूत होतात.
– खजुराच्या सेवनामुळे ह्रदयरोगाचा धोका कमी होतो. कारण यात कॅरोटेनॉईड आणि फिनोलीक ऍसिड हे घटक आढळतात.

थोडी काळजी घ्या…

बाजारातून खजूर घेताना आणि त्याचे सेवन करताना काळजी घ्या. खजूर स्वच्छ धुवून खा, कारण यावर असणाऱ्या धुळीमुळे संसर्ग होऊ शकतो. तसेच पचनास जड असल्याने व काहींना यामुळे कफचा त्रास होण्याची शक्यता असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करणे चांगले.

खारीक –

dry-dates

खजुराची बहीण असणारी खारीक शरीरासाठी उपयुक्त आहे. वर्षभर बाजारात उपलब्ध असणारी खारीक कधीही सेवन केली जाऊ शकते. याचे शरीराला अनेक फायदे होतात. स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या लैंगिक जीवनात खारकीचे विशेष स्थान आहे. तसेच शरीर सुदृढ बनवण्यासाठी खारीक आहारात असायलाच हवी.

काय आहेत फायदे?

– प्रसुतीनंतर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आणि बाळांत महिलेला ताकद येण्यासाठी खारीक खाण्यास सांगितले जाते.
– मासिक पाळीचा त्रास असल्यास नियमित खारीकचे सेवन केल्यास मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.
– खारीक खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते आणि चपळता वाढते.
– कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीराची आयर्नची गरज भागविण्यासाठी खारीक खाणे महत्वाचे आहे.
-खारीक वीर्यनिर्मितीचा स्तोत्र असून याचे रोज दुधासोबत सेवन केल्यास लाभ होतो. तसेच नियमित सेवन केल्यास नपुंसकतेचा त्रासही कमी होण्यास मदत होते.
– खारीकमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्याने यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणास राहते.
– खारकेत फायबर, जीवनसत्त्व बी 1, बी 2, बी 3, बी 5 आणि पोटॅशियमही आहे. लहान मुलांना योग्य प्रमाणात दिल्यास तब्येत सुधारण्यास मदत होते. तसेच यामुळे भूक वाढण्यासही मदत मिळते.
– रात्री झोपण्यापूर्वी दुधासोबत खारकेचे सेवन केल्याने ऊर्जा वाढते आणि लैंगिक जीवन आनंददायी होते.

काय घ्याल काळजी?

खारीक लहान मुलांना देताना त्यातील बी काढून देणे. तसेच याचे पचनास जड असल्याने प्रमाणात सेवन करावे.

आपली प्रतिक्रिया द्या