Tips : नवरात्रीत उपवास करणार आहात, मग ‘हे’ करून बघा; थकवा जाणवणार नाही

नवरात्रात नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा पूर्वापार सुरू आहे. यावर्षी 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. हिंदु धर्मातील महत्त्वाच्या धार्मिक उत्सवांपैकी हा एक महत्त्वाचा उत्सव आहे. या दिवसापासून अनेक ठिकाणी दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून तिच्या नऊ रुपांची उपासना करण्याची पद्धत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवीला प्रसन्न करण्यासाठी तिची उपासना केली जाते. यावेळी उपवास करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. काही जण एकच पदार्थ नऊ दिवस खातात, काही जण एकच वेळ अन्न ग्रहण करतात, तर काही जण नऊ दिवस फक्त फलाहारही करतात. यावर्षी देवीउपासनेचा एक भाग म्हणून तुम्हीही हे 9 दिवस उपवास करणार असाल, तर उपवासाच्या काही आरोग्यदायी टिप्स तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकतात.

बऱ्याचदा असे घडू शकते की, उपवासाचे नाव ऐकल्यास भूक लागते, कोणताही आकस्मिक बदल स्वीकारण्यापूर्वी, आपला मेंदू तो नाकारण्याचा प्रयत्न करतो. ही मेंदूची नैसर्गिक प्रक्रिया आहे. अशा परिस्थितीत उपवास करण्यापूर्वी या वेळेसाठी तुमच्या मनाची तयारी होणे महत्त्वाचे आहे. याशिवाय उपवास केल्याने वजन कमी होणे, शरीर हलके होणे यासारखे शारीरिक फायदेही होतात. शारदीय नवरात्रोत्सवात उपवास करण्याची तुमची इच्छा असेल तर तुमचे स्वास्थ्य आणि शारीरिक उत्साह टिकून राहण्यासाठी काही महत्त्वाच्या कृतींचा अवलंब करून पहा.

साखरेचे सेवन कमी करा
आहारात साखरेचे सेवन कमी प्रमाणात करा, मात्र जेव्हा रक्तातील साखर जेव्हा एक किंवा दोन तासांनी कमी होते तेव्हा तुम्हाला भूक लागण्याची शक्यता असते. अशा वेळी अशक्तपणाही जाणवू लागतो. अशावेळी दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहण्यासाठी आहारात कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनयुक्त उदा. बटाटा, रताळे, वरी अशा पदार्थांचा आहारात समावेश करा.

पुरेसे पाणी प्या
काही धार्मिक उपवासात पाणी आणि इतर पेये पिण्यास हरकत नसते. उपवासातही पुरेसे पाणी प्यायल्याने ऊर्जेची पातळी योग्य राखली जाते याशिवाय त्वचा हायड्रेटेड राहते. निर्जलीकरणाचा त्रास टळतो. डोकेदुखी, पायात पेटके येणे, चिडचिड होणे यासारखे त्रासही पुरेसे पाणी प्यायल्याने कमी होतात. यामुळे उपावासादरम्यान पुरेसे पाणी किंवा इतर फळयुक्त पेये पिण्याकडेही लक्ष द्या.

हलका व्यायाम करा
जेव्हा तुम्ही खाण्याचे प्रमाण कमी करता तेव्हा शरीरातील जडत्व वाढू शकते. उपवासाच्या दिवसात शरीर थकवणारा व्यायाम करू नका. यामुळे तुमच्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जोपर्यंत शरीराला पुरेसे पोषक मिळत नाही तोपर्यंत हलका व्यायाम करा.

उपवासापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
तुम्हाला जुनाट आजार असल्यास, उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. काही जण उपवासाच्या वेळी औषधे बंद करतात. असे करू नका. तत्पूर्वी डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत बोलणे गरजेचे आहे. अचानक औषधे बंद केल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकते.

उपवासाचे फायदे
कोलेस्टेरॉल सुधारण्यासाठी, ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यासाठी आणि ऊर्जा संतुलित करण्यासाठी उपवास फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे तुमचा उपवास करण्याचा निर्णय तुम्हाला आरोग्यादायी ठरेल, मात्र काही वेळा संभाव्य फायदे टाळण्यासाठी आधीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते तसेच बरेच दिवस उपवास करणेही आपल्यासाठी धोकादायक असू शकते, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.