झोपेत चालण्याची सवय असेल, तर वेळीच ‘हे’ उपचार करा

झोपेमध्ये चालणे याला ‘स्लीप वॉकिंग’ म्हणतात. यामध्ये व्यक्ति गाढ झोपेत असताना चालते. महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर तिला याविषयी काहीच आठवत नाही. काही वेळा ती व्यक्ति फक्त चालते, इतकंच नाही तर अंथरुणात उठून बसून राहतात किंवा स्वच्छता करणे, गाडी चालवणे किंवा इतर कामेही करतात. झोपेत चालणे ही फक्त सवय नसून हा एक गंभीर आजार आहे. काही वेळा या गंभीर आजारामुळे झोपेत स्वत:ला मारणे, दुसऱ्यावर जीवघेणा हल्ला करणे, अशा अपघात घडवून आणणाऱ्या घटनाही घडू शकतात. जाणून घेऊया या आजाराबद्दल-

झोप येणे किंवा जाग येणे या नैसर्गिक कृतींसाठी मेंदुमध्ये दोन प्रकारची रसायने स्त्रवत असतात. या रसायनांचं संतुलन योग्य प्रकारे असलं तरच आपल्याला व्यवस्थित झोप येते किंवा जाग येते. या रसायनांचं संतुलन योग्य प्रकारे असलं तर आपल्याला नीट झोप येते, मात्र या दोनपैकी कोणतंही एक रसायन बिघडल्यास झोपेत चालण्याचा विकार जडू शकतो. झोपेचे चार टप्पे आहेत. त्यापैकी गाढ झोप आणि ‘नॉन रॅपिड आय मूव्हमेंट’च्या टप्य्यात बहुतेक लोक झोपेत चालतात. या नॉन रॅपिड आय मुव्हमेंटमध्ये आपली स्मरणशक्ती काही काम करत नाही म्हणून झोप लागल्यावर काय केलं हे चालणाऱ्यांना दुसऱ्या दिवशी काहीच आठवत नाही.

काय असतात याची लक्षणे?
– झोपेत चालणाऱ्या व्यक्तींचे डोळे जरी उघडे असले तरी त्यांना आपण काय करतो आहोत याची जाणीव नसते. त्यामुळे काहीही केलं तरी त्यांना त्याबद्दल काहीच लक्षात राहत नाही.
– चालताना ते जे काही करतात ते काही सेकंद किंवा 20-40 मिनिटांच्या कालावधी दरम्यान करू शकतात.
– चालून झाल्यावर किंवा अन्य काही करून या व्यक्ती आपल्या अंथरूणात परत येतात.
– बाकी कृती करत असल्यामुळे त्यांना सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे स्वप्नं पाहणं जमत नाही.
– हा विकार लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात होतो.

काय असतात याची कारणे?
– आधीच्या पिढ्यांमध्ये हा विकार असेल तर तो पुढच्या पिढ्यांकडे संक्रमित होत असतो.
– जागेपणी अपूर्ण राहिलेल्या इच्छा; त्याचा मनावर परिणाम होऊन त्या इच्छा पूर्ण करता याव्यात म्हणून झोपेत काही कृती करण्याचा प्रयत्न केला जातो.
– थकवा, ताण-तणाव, गोंधळून जाणे, पुरेशी झोप न मिळणे, खूप ताप येणे यामुळे हा विकार जडू शकतो.
– शरीरात मेंदूतून स्रवणारी संप्रेरके म्हणजेच हॉर्मोन्सचं प्रमाण जर असंतुलित झालं तर व्यक्ती झोपेमध्ये चालू शकतात.

उपचार काय कराल ?
– या व्यक्तींना त्यांच्या आजाराबद्दल अवगत करून देण्यासाठी साधा मार्ग म्हणजे त्यांच्या हालचाली व्हिडिओद्वारे चित्रीत कराव्यात आणि याविषयी त्यांना शांतपणे सांगावे.
– पण आधीच मानसिक स्वास्थ्य नीट नसलेले लोक त्यांच्या सवयीचे व्हिडीओ पाहताना मानसिकरित्या अजूनच कोलमडू नयेत याबद्दल सतर्क रहावे.
– ताणतणाव, थकवा यामुळे मन:स्थिती नीट नसते. यावर उपाय म्हणून योग्य आहार, ध्यानधारणा, व्यायाम करायला सांगितला जातो.
– त्यांच्या अपूर्ण इच्छांबद्दल त्यांना योग्य ते मार्गदर्शन समुपदेशक डॉक्टर करू शकतात.
– झोपेमध्ये चालण्याच्या या विकाराला मजेचा भाग म्हणून न बघता गांभीर्याने घ्यायला हवं. याकरिता वेळीच आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.