‘हे’ पदार्थ खाल्ल्याने वाढतोय कर्करोगाचा धोका, शास्त्रज्ञांनी दिला सतर्कतेचा इशारा

हल्ली लोकांना अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खायला जास्त प्रमाणात आवडतं. या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण कमी आणि साखरेचं आवश्यकतेपेक्षा जास्त असतं. असे पदार्थ खाल्ल्याने पोट भरतं शिवाय वजनही झपाट्याने वाढतं. आहारतज्ज्ञांच्या मतानुसार, अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी सर्वात जास्त धोकादायक आहे. अल्ट्रा प्रोसेस्ड फूड जास्त काळ खाल्ल्यास शरीरात कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या अन्नपदार्थांबाबत सतर्कतेचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स आणि पॅकबंद अन्न खाल्ल्याने कर्करोगाचा धोका जास्त असतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. यामुळे अनेक प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. यासोबतच लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोकाही वाढतो. जाणून घेऊया, अल्ट्रा प्रोसेस्ड फूडविषयी-

अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमध्ये अनेक घटकांचा समावेश असतो. हे अन्न अनेक प्रक्रियांमधून जाते. अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्सना कॉस्मेटिक फूड्स असेही म्हणतात. या अन्नपदार्थांमधून सर्व प्रकारचे घटक काढून टाकले जातात. अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे फॅक्टरी मेड फूड. अल्ट्रा-प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये फक्त कॅलरीज असतात आणि त्यात फायबरसह साखर जास्त आणि प्रथिनांचे प्रमाण कमी असते.

झटपट नूडल्स आणि सूप, तयार अन्नपदार्थ, पॅकिंग केलेले स्नॅक्स, फिजी कोल्ड्रिंक्स, केक, बिस्किट, हवाबंद मिठाई, पिझ्झा, पास्ता, बर्गर हे अन्नपदार्थ अल्ट्र प्रोसेस्ड फूड्समध्ये समाविष्ट आहेत.

इंपिरियल कॉलेज ऑफ लंडनच्या एका संशोधनात असे उघडकीस आले आहे की, जर अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड जास्त काळ खाल्ले, तर त्यामुळे शरीरात कर्करोगाचा धोका वाढू शकतो. येथील एझ्टर वामोस या लेखकाने एका अभ्यासात सांगितले की, अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न केवळ कर्करोगाचा धोका नाही, तर ते आरोग्यासाठी सर्वात हानिकारक अन्न आहे. अल्ट्रा प्रोसेस्ड अन्न बहुतेक मुले आणि प्रौढ खातात. त्यामुळे त्याचा आरोग्यावर होणारा वाईट परिणाम भविष्यात दिसून येईल.

– अल्ट्रा प्रोसेस्ड फूड हे लठ्ठपणा, टाईप 2 मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी हृदयरोगाशीदेखील संबंधित असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे. कार्डियोवॅस्कुलर यामध्ये ह्रदय विकार, हार्ट स्ट्क आणि हृदयविकाराचा झटका यासारख्या समस्यांचा समावेश होतो.

– यूके बायोबँकच्या रेकॉर्डमध्ये सुमारे 2 लाख प्रौढांची माहिती देण्यात आली होती, असे एका अभ्यासात सांगण्यात आले. ज्यामध्ये संशोधकांनी 10 वर्षे त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले आणि त्यांच्यातील 34 प्रकारच्या कर्करोगाचे निरीक्षण केले. कॅन्सरमुळे किती लोक मरत आहेत हेही त्यांनी तपासले.

– अल्ट्रा प्रोसेस्ड फूडच्या सेवनामुळे गर्भाशयाचा कर्करोग आणि मेंदूचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. संशोधकांनी असेही निदर्शनास आणून दिले की, कर्करोगाने मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेकांना गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग होता. त्यांनी पुढे सांगितले की, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचे सेवन 10 टक्क्यांनी वाढले तर कर्करोग होण्याचा धोका सुमारे 2 टक्क्यांनी वाढतो. अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो.

अल्ट्रा प्रोसेड अन्नपदार्थांपासून दूर राहा
लोकांनी आपल्या सकस आहाराची जास्तीत जास्त काळजी घ्यावी तसेच अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडपासून दूर राहावे. खाण्याच्या सवयी बदलत राहायला हव्यात तसेच निरोगी जीवनशैलीचे पालन करणे आवश्यक आहे.