लिफ्ट व सरकत्या जिन्यांमधील अपघातग्रस्तांना विमाकवच

सामना प्रतिनिधी । मुंबई

अत्याधुनिक प्रकारची उद्वाहने आणि सरकते जिने यांचा मोठय़ा प्रमाणावर होणारा वापर लक्षात घेऊन अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना विमा संरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. उद्वाहन कायदा 1939 मध्ये सुधारणा करण्यास आज राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून आता या कायद्यातील सुधारणेचा मसुदा विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. येत्या नागपूर अधिवेशनात हे सुधारणा विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात येईल.

मुख्य विद्युत निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नवीन तंत्रज्ञान व अत्याधुनिक प्रकारची उद्वाहने व सरकते जिने याबाबत सुधारणा सुचवल्या आहेत. सरकते जिने, उद्वाहन यांचा वापर करताना अपघात झाल्यास संबंधितांना विमा संरक्षण मिळणार आहे.

1939 च्या कायद्यात सरकते जिने व सरकते मार्ग याबाबत कोणतीही तरतूद नाही. नवीन तंत्रज्ञानाचे विकसित उद्वाहने, सरकते जिने व सरकते मार्ग यासंबंधी सर्व यंत्रणा व उपकरणे यांची उभारणी, देखभाल व सुरक्षिततेच्या उपाययोजना अस्तित्वात असणे आवश्यक असल्याने त्याचा समावेश नवीन कायद्यात करण्यात आला आहे. उद्वाहन, सरकते जिने व सरकते मार्ग यांचे आयुर्मान निश्चित करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या