भावसंगीतातील हिरवा चाफा

464

<< यादों की बारात >>

<<   धनंजय कुलकर्णी  >>

काही स्वर असे असतात की त्यांना आपण ओळखत असतो, त्या स्वराशी आपल भावनिक नातं देखील छान जुळलेलं असतं पण केवळ लोकप्रियतेच्या निकषावर तो आवाज काहीसा मागे पडल्याने मग आपसूकपणे तो विस्मृतीच्या कोषात वेढला जावू लागतो आणि अचानकपणे तो आवाज कानी पडतो. धुक्याच्या आत दडलेला, मायेने जपलेला तो स्वर युगायुगाची ओळख पटवत मनाला रुंजी घालू लागतो. काळजाच्या आत खोलवर जपलेला सुमन कल्याणपूर यांचा स्वर याहून वेगळा तो काय?

केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, जिथे सागरा धरती मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, न तुम हमे जानो न हम तुम्हे जाने, आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर ही सुमनने गायलेली गाणी कानावर पडली की मन बेचैन होतं… आयुष्यात ज्या आवाजाने आमचं भावविश्व जपल, हर घडीला ज्या स्वराने एक आपुलकीची उब दिली त्या स्वराला आम्ही विसरलो? खरा रसिक तिच्या आवाजाला, तिच्या गाण्याला विसरू म्हटलं तरी विसरू शकत नाही. तसं बघितलं तर तिच्या आवाजाच गारूड, तिच्या गाण्याचं मोहोळ असं कधी काही नव्हतंच. पण तरीही काही गाणी अशी असतात ती सुमनकरीता आठवावी लागतातच. सुमन कल्याणपूर येत्या २८ जानेवारीला वयाची ८० वर्षे पूर्ण करीत आहेत. (जन्म २८ जानेवारी १९३७) सहस्त्रचंद्रदर्शनात पदार्पण करीत असलेल्या या गायिकेच्या गायकीचा आढावा घेताना तिच्या स्वच्छ, पारदर्शी अन भावनाप्रधान आयुष्याचं प्रतिबिंब तिच्या गायन कलेवर पडलेलं दिसतं.

विधात्याने तिचं आयुष्य घडवताना फारशी आडवळणं, संघर्ष, स्पर्धा यापासून तिला दूरच ठेवलेलं असावं. यशाच्या मागे जीवाच्या आकांताने त्या कधी धावल्या नाहीत, मिळालेलं यश कधी टिकविण्यासाठी जीवाचा फारसा आटापिटा केला नाही. ज्या क्षणी वाटलं आता गायनाची गरज नाही त्या क्षणी त्यांनी गाणं थांबवलं. वाटय़ाला आलेलं सरळसोप्पं आयुष्य चवीनं जगत सुमन कल्याणपूर आता वयाच्या उत्तरार्धात सुखी, समृद्ध आयुष्य जगताना दिसतात. सच्चे कलागुण हाताशी असूनही स्वराचं मोठं नंदनवन फुलविता आलं नाही याची ना खेद ना खंत. उगाच अश्रू ढाळून उसासे टाकत सहानभूती खेचायचा प्रकार नाही, की आपल्यावर अन्याय झाला अशी ओरड नाही.

अत्यंत गोड गळा आणि शब्दातील भावार्थ अचूकपणे समजून गाणाऱया या गायिकेचा जन्म आज बांगला देशमध्ये असलेल्या भवानीपूरचा! तिचं माहेरचं आडनाव हेमाडी. लग्नापूर्वी ती सुमन हेमाडी नावानेच गात असे. घरातील वातावरण एकदम कलासक्त, रसिक आणि धार्मिक. याचे तिच्या बालमनावर चांगले संस्कार झाले. लहानपणी ती खूप छान चित्रं काढायची. पुढे मुंबईत आल्यावर तिने चक्क जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये काही काळ धडे गिरवले. घरात रेडीओ अव्याहतपणे चालू असायचा. सैगल, नूरजहान, खुर्शीद, सुरय्या यांच्या अप्रतिम गाण्यांनी धुंद झालेला तो काळ होता. सुमन सदैव गाणी गुणगुणत असे. नाटककार मो.ग.रांगणेकर, केशवराव भोळे, ज्योत्स्ना भोळे या कलावंत मंडळींची त्यांच्या घरी उठबस होती. अशा या जोहरी कडून सुमनसारखा हिरा गवसला नाही तरच नवल! अशा तऱहेने तिच्या संगीताच्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला तो यशवंत देव यांच्याकडे! देवांनीच तिला पहिल्यांदा सिनेमाकरीता गाण्याची संधी दिली. हा सिनेमा कधी आलाच नाही पण या गाण्याच्या ध्वनीमुद्रणाच्या वेळी हिंदी चित्रपटाचे संगीतकार महंमद शफी तिथे मौजूद होते. त्यांना सुमनचा आवाज आवडला व लगेच त्यानी त्यांच्या ’मंगू’ सिनेमाकरीता तिला साईन केले. ’कोई पुकारे धीरेसे तुझे आंख के तारे’ हे तिचं रूपेरी पडद्यावरच पहिलं गीत. (सुमनच्या कंठाची मूळ प्रकृती नाजूक आणि तरल असल्याने अतिरेकी रियाज तिच्या गळ्याला मानवायचा नाही. म्हणूनच कदाचित ती शुद्ध शास्त्राrय आणि नाटय़संगीताच्या फारशी वाटय़ाला गेली नसावी.) सुमन गायकीच्या क्षेत्रात आली (१९५४) त्या वेळी लताचा स्वर आसमंतात संपूर्ण तेजाने चमकत होता. आशाचादेखील तो उमेदवारीचा कालखंड होता. शमशाद, गीतादत्त, सुरय्या या लताला सिनियर असलेल्या गायिका कार्यरत होत्याच. स्पर्धा मोठी जबरदस्त होती. अशा या वातावरणात सशाचं काळीज असलेल्या सुमनला आपलं अस्तित्व टिकवणंच मुळात कठीण होतं पण तिने एक केलं, तन्मयतेने आपलं काम करीत राहिली. तिच्या वाटय़ाला गाणी येणार तरी कोणती? या सर्व गायिकांनी नाकारलेली किंवा त्याचं मानधन न परवडू शकणारी. परबतो के पेडो पर शाम का बसेरा है(शगुन),गरजत बरसात सावन आयोरे (बरसात की एक रात), ये मौसम रंगीन समा (मॉडर्न गर्ल), न तुम हमे जानो न हम तुम्हे जाने (बात एक रात की), कहती है झुकी झुकी नजर (जिंदगी और ख्वोब ), ठहरीये होश मे आलू तो चले (मोहब्बत इसको कहते है), जबसे हम तुम बहारो मे (मैं शादी करने चला), तुम जो आओ तो प्यार आजाये जिंदगी मे बहार (सखी रोबिन) आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर (ब्रह्मचारी) मेरा प्यार भी तू है ये बहार भी (साथी) अशा  कितीतरी गाण्यांनी रसिकांवर राज्य केले.  सुमन-रफी ने गायलेल्या मन मोहन मन मे हो तुम्ही (कैसे कहू) या गीताला तर मानाचा तानसेन पुरस्कार लाभला. हिंदीत विशेषतः १९६५ नंतर लता-रफी यांच्यात काही काळ वितुष्ट आल्याने रफी-सुमनची बरीच गाणी आली पण त्या दोघात पुन्हा एकोपा झाल्यावर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! हिंदीतील हा स्ट्रगल सुमनला मराठी आणि विशेष करून भावगीतात करावा लागला नाही. स्नेहल भाटकर, अशोक पत्की, दशरथ पुजारी, खळे, सुधीर फडके, वसंत प्रभू, कमलाकर भागवत या सर्वांकडे सुमन गायली!

मराठी गाणी म्हणजे रसिक मनाला स्मृतीगंधाचा दरवळ देणारा लोभस आनंद. देवा दया तुझी ही (बोलकी बाहुली), अरे संसार संसार (मानिनी), जिथे सागरा धरणी मिळते (पुत्र व्हावा ऐसा), बघत राहू दे तुझ्याकडे (सुभद्रा हरण), तुझ्या कांतिसम रक्त पताका, लिंबलोण उतरू कशी (एकटी), सांग कधी कळणार तुला भाव (अपराध), कशी करू स्वागता (मुंबईचा जावई), धागा जुळला जीव फुलला वेडया बहिणीला (धाकटी बहीण) निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई (बाळा गाऊ कशे अंगाई) ही काही भावगीतं. चित्रपटाप्रमाणेच सुमनचा स्वर भाव आणि भक्तीगीताशी निगडीत झाला आणि रसिकांना नंदाघरी नंदनवन फुलल्याचा प्रत्यय आला. सुमनची मराठी भाव आणि भक्तीगीतं ऐकली की मराठी घरातील साठ आणि सत्तरच्या दशकातलं मनाला हळवं करणारं वातावरण डोळ्यांपुढे येतं. सुमनच्या कितीतरी गीतांनी मराठी मनाचं भावविश्व जपलं आहे. वानगीदाखल काही गाणी आठवून पहा. घाल घाल पिंगा वाऱया माझ्या परसात, रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात, ते नयन बोलले काहीतरी, नकळत सारे घडले, नाविका रे वारा वाहे रे, पाखरा जा दूर देशी, सांग माझा निरोप माझ्या साजना, पिवळी पिवळी हळद लागली, वाट इथे स्वप्नांची संपली जणू, मृदुल करांनी छेडीत तारा, येणार साजन माझा या भावगीतांबरोबरच ओमकार प्रधान रूप गणेशाचे, चंदनाचे हात पाय ही चंदन, सावळ्या विठ्ठला तुझ्या दरी आले, बुडता आवरी मज, नाम आहे आदी अंती, केशवा माधवा, देह जावो अथवा राहो, देह शुध्द करूनी, देव माझा विठू सावळा, दिनांचा कैवारी, जाग रे यादवा कृष्ण गोपाळ, चल उठ रे मुकुंदा, आकाश पांघरोनी जाग शांत झोपलेले या सुमनच्या भक्तिगीतांनी रसिकांच्या हृदयात घर केलं. सुमने मराठी आणि हिंदी व्यतिरिक्त इतर प्रादेशिक भाषांमधून देखील गायन केले. तिने गायलेल्या एकून गीतांची संख्या ३००० हून अधिक भरेल. सारी कारकीर्द घडताना तिला आधी पिता आणि नंतर पती या दोघांचा मोठा हातभार लागला. संपूर्ण कारकिर्दीत ती स्पर्धा, हेवा, स्वार्थ या नकारात्मक बाबींपासून चार हात दूर राहिली. तिला आपल्या कर्तृत्व आणि मर्यादा या दोन्हीची पुरेपूर जाण होती. त्या मुळे वेगाच्या आवेगात नेमकं कुठे थांबावं हे तिला अचूक कळलं.

तिच्या समकालीन गायिकांचा विचार करता मंगेशकर भगिनींच्या पुढे टिकून स्वतःला सिद्ध करणारी ती एकमेव गायिका ठरली. सुमनचे चाहते आजही देश-विदेशात मौजूद आहेत.अनेक ठिकाणी  तिच्या गाण्याचे कार्यक्रम झाले. बीबीसी वर मुलाखत देणारी ती पहिली कलावंत ठरली. त्यांचा स्नेह, आप्तस्वकीयांची आत्मीयता आणि रसिकांचे प्रेम यात सुमन ८१ व्या वर्षात तृप्त मनाने जगते आहे. सच्च्या कलावंताला आणखी काय हवं असतं?

 

 

आपली प्रतिक्रिया द्या