स्वातंत्र्यानंतर प्रथमच सिन्नरची टोळवस्ती प्रकाशमान, शिवसेना आमदार वाजे यांच्या प्रयत्नातून विद्युत योजना

39

सामना ऑनलाईन, नाशिक

सिन्नर तालुक्यातील अतिदुर्गम अशा पिंपळे येथील टोळवस्तीवर स्वातंत्र्यानंतर गुरुवारी प्रथमच वीज पोहोचली आणि सर्व आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. शिवसेना आमदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रयत्नातून ही विद्युतीकरण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या वस्तीसोबतच गर्डीची वाडी (सोनेवाडी) व पिंपळगाव (धनगरवाडी) येथील योजना पूर्णत्वाकडे पोहोचल्या असून, हा परिसरही लवकरच प्रकाशमान होणार आहे.

पिंपळे गावापासून सात किलोमीटर अंतरावर वीस ते पंचवीस आदिवासी कुटुंबांची टोळवस्ती आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पाठपुराव्याने येथे जिल्हा नियोजनची आदिवासी वाडी-वस्ती विद्युतीकरण योजना मंजूर झाली. तामकरवाडीपासून या वस्तीपर्यंत ६५ सिमेंटचे विद्युत खांब उभारुन डीपीचे काम पूर्ण करण्यात आले. वस्तीपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नसल्याने येथील आदिवासी बांधवांनी या परिसरात उभारण्याचे ३० विद्युत खांब खांद्यावर वाहून आणले.

आमदार वाजे हे गुरुवारी पाडली गावापासून मोटारसायकलवरून या ठिकाणी दाखल झाले, त्यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ झाला. येथे रस्त्याचे काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली. योजना कार्यान्वित झाल्याबद्दल नागरिकांनी आमदार वाजे यांचे आभार मानले. यावेळी ठाणगावचे सरपंच नामदेव शिंदे, रामनाथ पावसे, पिंपळेचे सरपंच तुकाराम आगीवले, भीमा मेंगाळ, बस्तीराम मेंगाळ, तुकाराम खडके, भागवत आगीवले, विठ्ठल गावंडे, दत्तू मेंगाळ, विठ्ठल पथवे, बाबुराव शिंदे, लक्ष्मण खडके उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या