वीज कोसळून मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये हिंदुस्थानी सर्वाधिक

30

सामना ऑनलाईन । मुंबई

जगातील इतर देशांच्या तुलनेत हिंदुस्थानात वीज कोसळून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. विशेषतः उत्तर हिंदुस्थानात वीज कोसळल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. वीज कोसळून मरण पावण्याच्या हिंदुस्थानात एका वर्षात तब्बल एक हजार घटनाही घडल्या आहेत. वीज कोसळून मरण्याचा हाच आकडा अमेरिकेत वर्षाकाठी ३० तर इंग्लंडसारख्या देशांमध्ये ३ असा आढळतो.

मग जगभरात वीज कोसळूनही फक्त हिंदुस्थानातच सगळ्यात जास्त मृत्यू होण्यामागचं कारणं काय असू शकेल..? या प्रश्नाच्या उत्तरात अनेक कारणं समाविष्ट होतात. त्यातील पहिलं कारण म्हणजे अमेरिकेत आणि इंग्लंडसारख्या देशांमध्ये हवामान खातं हे अतिशय सक्षम आहे. त्यांच्या हवामान खात्याकडून वर्तवलेले अंदाज हे अतिशय अचूक असतात. त्या तुलनेत हिंदुस्थानी हवामान खातं तांत्रिक दृष्ट्या प्रगत नाही, असे तज्ज्ञ सांगतात.

दुसरं कारण म्हणजे, जून ते सप्टेंबरच्या दरम्यान वाहणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग. अरबी समुद्रातून हिंदुस्थानच्या नैऋत्येपासून ते ईशान्येपर्यंतचा प्रवास करणारे हे नैऋत्य मान्सून वारे उत्तर हिंदुस्थान आणि ईशान्य हिंदुस्थानात अतिशय वेगाने पोहोचतात. त्यामुळे तिथे धुवांधार पाऊस होतो. अशा मोसमी वाऱ्यांमुळे वीज निर्माण होते आणि कोसळते.

याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे हिंदुस्थान हा कृषिप्रधान देश आहे. शेतीच्या कामांसाठी मोकळ्या जमिनीवर वावरणारे शेतकरी आणि शेतमजूर बहुतांशवेळा विजेच्या प्रभावाखाली येऊन मृत्युमुखी पडतात.

आपली प्रतिक्रिया द्या