मुसळधार पावसात वीज कोसळून चार जणांचा मृत्यू, ७ गंभीर

16

सामना प्रतिनिधी । नागपूर

गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील धन्नूर येथे शुक्रवारी रात्री वीज कोसळून ४ जण मृत्यू पावले असून ७ जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींना आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धन्नूर येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसापासून वाचण्यासाठी लोकांनी झाडाखाली लोकांनी आश्रय घेतला. त्याचदरम्यान झाडावरच वीज कोसळल्याने ४ जणांचा जाग्यावरच मृत्यू झाला तर ७ जण गंभीर जखमी झाले.

मृतकांमध्ये संदीप शिवराम कुसनाके (३०), रितेश शामराव कान्नाके (२५), जाणिकराम लालू तोडसाम (४३), शामराव मुन्नी कान्नाके (५८), तर जखमींमध्ये लचमा मंगा कान्नाके, दिपक तुळशीराम कुसनाके, लक्ष्मण सोमा तोरे, विलास मारोती आत्राम, दिवाकर गिरमा तलांडे, रमेश मुरलीधर कुसनाके, आकाश विलास कुसनाके यांचा समावेश असून सर्वांना ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या