वनराज

92

अनंत सोनवणे

सिंह नावाचा प्राणी आता जगात फक्त दोनच ठिकाणी अस्तित्वात आहे आफ्रिकेत आणि हिंदुस्थानात… आपल्याकडे गुजरात राज्यातल्या सासन–गीर वन्य अभयारण्यात आशियाई सिंह ही प्रजाती तग धरून आहे…

तमाम महाराष्ट्रात नवरात्रीची धामधूम सुरू आहे. नऊ दिवस देवीची मनोभावे पूजाअर्जा करताना भाविक तिच्या प्रत्यक्ष दर्शनाची आस मनी बाळगून असतात. देवीचं दर्शन मिळेल की नाही, माहीत नाही. मात्र या देवीचं जे वाहन आहे वनराज सिंह, त्याचं प्रत्यक्ष दर्शन घेता येऊ शकतं. सिंह नावाचा प्राणी आता जगात फक्त दोनच ठिकाणी अस्तित्वात आहे आफ्रिकेत आणि हिंदुस्थानात! आपल्याकडे गुजरात राज्यातल्या सासन-गीर वन्य जीव अभयारण्यात आशियाई सिंह तग धरून आहे.

वन्य जीव संपदेनं अतिशय संपन्न असा हा प्रदेश 19 व्या शतकात प्रमुख शिकार केंद्र होतं. राजेरजवाडे, ब्रिटिश अधिकारी आणि सामान्य जनतेनंही इथं बेसुमार शिकार केली. त्यात राजबिंडय़ा सिंहाचीही वारेमाप कत्तल झाली आणि एका क्षणी या संपूर्ण प्रदेशात अवघे डझनभर सिंह शिल्लक राहिले. मग मात्र ब्रिटिश व्हाईसरॉय आणि जुनागढच्या नवाबानं या जंगलाला आणि सिंहाला संरक्षण दिलं. कालांतरानं इथं राष्ट्रीय उद्यान आणि वन्य जीव अभयारण्याची घोषणा झाली. या साऱया प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणून इथं सिंहांची संख्या वाढत गेली आणि 2015 च्या पंचवार्षिक सिंह गणनेत इथं एकूण 523 सिंह असल्याचं स्पष्ट झालं.

सिंह हा कळपाने राहणारा प्राणी आहे. एका सिंहाच्या अनेक सिंहिणी असतात. चार-पाच ते वीस-तीस सिंह-सिंहिणी बछडय़ांचा एक कळप असू शकतो. नर कळपाचं नेतृत्व करतो. शिकार, बछडय़ांचं संगोपन ही काम प्रामुख्यानं माद्या करतात. नर आणि मादी दोघंही डौलदार, शानदार असतात. मला आठवतं, माझ्या गीर अभयारण्य भेटीदरम्यान सकाळच्या वेळी आमची एकमेव जिप्सी एका वाटेवरून जात असताना अगदी समोरून एक भला थोरला एकांडा नर झोकात चालत आला. दमदार पावलं टाकत तो आमच्याच दिशेने आला. आम्ही रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून शांतपणे बसून राहिलो. आमच्यापासून अवघ्या आठ-दहा फुटांवर येऊन तो थांबला. मागच्या दोन पायांवर उभं राहून पुढच्या पंज्यांच्या नख्यांनी झाडाच्या खोडावर ओरखडे काढले. एक मस्त आळस दिला आणि फक्त एकदाच आमच्या दिशेनं एक बेफिकीर कटाक्ष टाकून पुन्हा मार्गस्थ झाला. पुढची 25 मिनिटं आम्ही मंत्रमुग्ध झाल्यासारखे त्याच्या मागून जात राहिलो. त्यानं एकदाही मागे वळून पाहिलं नाही.

lion-3

नंतरच्या दोन दिवसांत दुपारी आळसावून चारही पाय हवेत उंचावत मातीत लोळणारी सिंहीण, झाडाखालच्या सावलीत वामकुक्षी घेणारा अवघा कळप, सकाळी कोवळी उन्हं अंगावर घेत आपल्या साम्राज्याकडे अभिमानाने पाहणारा दोन नर आणि तीन माद्यांचा कळप अशा अनेक रूपांत सिंहाचं दर्शन होत राहिलं. गीरच्या जंगलात सिंहासाठी भक्ष्यही विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, चितळ, सांबर, चौशिंगा, नीलगाय, चिंकारा, रानडुक्कर इ. याशिवाय इथं साळिंदर, रानससा, मगर, घोरपड, कासव, अजगर आणि विविध प्रकारचे सापही पाहायला मिळतात. धोक्याच्या वेळी शरीराचा चेंडूसारखा आकार बनवणारे खवले मांजर आणि त्याला चेंडू समजून त्याच्याशी खेळणारे सिंहाचे दोन बछडे हा बहुचचित व्हिडीओ गीरच्या जंगलातच चित्रित केलेला.

आतापर्यंत वर्णन केलंय ती गीर अभयारण्याची केवळ उजेडाची बाजू झाली. अंधारी बाजू अंगावर येणारी आहे. गवताळ जमिनीवरचं अतिक्रमण, चोरटी शिकार, लाकूडतोड अजूनही थांबलेली नाही. अभयारण्याच्या आसपास एखादी म्हैस आमिष म्हणून बांधून ठेवून परदेशी पर्यटकांना सिंहांचा ‘लाईव्ह किल शो’ दाखवण्याचे प्रकार अनेकदा उघड झालेत. सिंहांना कोंबडय़ाच्या खुराकाची सवय लावून त्यांना पाळीव कुत्र्यासारखं उडय़ा मारायला लावतानाची चित्रफीतही उपलब्ध आहे. याच्यापेक्षा भयानक म्हणजे सध्या एकामागोमाग एक जात असलेलं सिंहांचे बळी. अशा एखाद्या साथीत गीरमधला सिंह पूर्णतः नामशेष होऊ शकतो. म्हणून काही सिंहांना मध्य प्रदेशात नव्या अधिवासात हलवण्याचा प्रस्ताव होता. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘गुजरातचा अभिमान’ कुणालाही देणार नाही असा  पवित्रा घेतला आणि तो प्रस्ताव नाकारला. त्याचे परिणाम आज आपण सिंहांच्या मृत्यूमध्ये पाहतो आहोत. आता तरी गुजरात सरकार आणि तिथल्या वन प्रशासनानं जागं व्हायला हवं. अभयारण्यात सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा बसला नाही आणि बोगस अभिमानाचा राजकीय आविर्भाव सोडला नाही, तर आपल्या पुढच्या पिढय़ांना सिंह पाहण्यासाठी थेट आफ्रिकेलाच जावं लागेल.

सासन-गीर अभयारण्य

प्रमुख आकर्षण…सिंह

जिल्हा…जुनागढ, गिर सोमनाथ, अमरेली

राज्य…गुजरात

क्षेत्रफळ…1412 चौ.कि.मी.

निर्मिती…1965

जवळचे रेल्वेस्थानक….वेरावळ

(45 कि.मी.)

जवळचा विमानतळ….केशोद

(70 कि.मी.)

निवास व्यवस्था…वन विभागाचे विश्रामगृह, खाजगी हॉटेल्स

योग्य हंगाम….डिसेंबर ते मार्च

सुट्टीचा काळ…16 जून ते 15 ऑक्टोबर

साप्ताहिक सुट्टी… बुधवार

आपली प्रतिक्रिया द्या