तालुक्यात गावठी दारू हातभट्टी उद्ध्वस्त

83

सामना ऑनलाईन, कळवण

तालुक्यातील गांगवन, जुनीबेज व भादवण परिसरातीळ गिरणा नदीच्या काठावर सुरू असलेल्या गावठी दारू निर्मितीच्या हातभट्टीवर पहाटेच्या सुमारास छापा मारून उद्ध्वस्त करीत तीन जणांवर कारवाई केली आहे.

कळवण तालुक्यातील अनेक गावात गावठी दारू निर्मितीचे अड्डे सुरू आहेत. या दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उघडय़ावर आले आहेत. गावागावात भांडणे सुरू आहेत. आदिवासी मजूर वर्गातील महिलांना या स्वस्त दारूचा जास्त फटका बसत होता. दिवसभर रोजंदारी करून थकून आलेल्या महिलांकडे दारूसाठी पैशाची मागणी करणाऱ्या कामचुकार नवऱ्यांकडून या महिलांना मारहाण होत असते.

आदिवासी महिलांच्या व सुज्ञ नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन कळवण पोलीस निरीक्षक सुजय घाटगे, सहाय्यक निरीक्षक विनोद जाधोर, गडाख, हवालदार बबनराव पाटोळे आदींनी आज पहाटेच्या सुमारास गिरणा नदीकाठच्या गांगवन, जुनीबेज व भादवण परिसरात कारवाई करून तीन जणांवर कारवाई केली आहे.

नवीबेज गावातील शहीद कॅप्टन अनिल पवार चौकात मद्यपींचा धिंगाणा दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे अवैध दारू विक्रीविरोधात नवीबेज ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचून नवीबेज गाव शिवारातील अवैध दारू हद्दपार करावी असा ठराव करण्यात आला होता. यामुळेच या शिवारात ही कारवाई झाल्याची चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या