खानापूर तांड्यावर दारू माफियाकडून हैदोस, 5 गंभीर जखमी

1318

तालुक्यातील खानापूर लमाण तांड्यावर 21 नोव्हेंबर रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास दारू माफिया अरुण रेवा चव्हाण, त्याचे भाऊ, वडील रेवा चव्हाण व चुलते देवीदास चव्हाण आदी 10 ते 12 जणांनी नियोजनाने तलवार, चाकू, कुऱ्हाड व लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. गावात दारू बंदीसाठी ग्रामसभा का बोलावली म्हणून हातात तलवारी घेऊन गावातील महिला व पुरुषांवर हल्ला चढवला. या घटनेत जवळपास 10 महिला पुरुष व तरुण मुले जखमी झाले असून त्यात 5 व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत.

यात कांताबाई गुलाब पवार, वामन गोविंद चव्हाण, शरद व्यंकट राठोड, अमीत गुलाब पवार, शांता वामन चव्हाण हे 5 जण गंभीर जखमी असून अन्य 5 ते 7 जणांनाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. जखमींना तातडीच्या उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गावात गत अनेक वर्षांपासून अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. खानापूर तांड्यातील महिला व पुरुषांनी याबाबत यापूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पण दुर्दैवाने इच्छा शक्तीच्या अभावाने गावातील दारू विक्री बंद झाली नाही.

शुक्रवारी खानापूर तांड्यावर गावातील दारूबंदी कायमस्वरूपी व्हावी यासाठी ग्रामसभा बोलावली. यावेळी महिला व अनेक पुरुषांनी दारूबंदी बद्दल गाऱ्हाणे मांडले. यासभेत दारू बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे संतप्त झालेला दारू विक्रेता अरुण रेवा चव्हाण यांनी आज संध्याकाळी उशिराने हातात तलवारी घेऊन हैदोस घातला. यावेळी त्याने जवळपास 10 महिला पुरुष व तरुणावर हल्ला केला. यात पाच व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर तातडीच्या उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले आहे. गत 15 दिवसांपूर्वी नूतन आमदार अभिमन्यू पवार यांनी तालुक्यात सर्वत्र कायम स्वरुपात दारूबंदी बाबतीत आदेश दिले होते. पण दुर्दैवाने पोलिसांच्या इच्छेअभावी दारूबंदी झाली नाही. आजच्या घटनेमुळे औसा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. घटना घडून 48 तास उलटून गेले असतांना सुद्धा औसा पोलिसात गुन्हा दाखल न झाल्याने सर्व सामान्य जनतेत पोलिसांच्या कामकाजावर संशय व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या