
पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत अनेकदा बातम्या प्रसारित होत असतात. असाच एक प्रकार विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर उघड झाला आहे. शिखांसाठी पवित्र असलेल्या कर्तारपूर साहिब गुरुद्वारा परिसरात दारूच्या पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यानंतर शीख समुदायात संतापाची लाट उसळली आहे.
हा गुरुद्वारा पाकिस्तानात असून शीख समुदायासाठी पवित्र स्थळ आहे. शिखांचे पहिले गुरू गुरुनानक सिंग यांनी आपले अंतिम क्षण या गुरुद्वारात घालवले. त्यामुळे हे ठिकाण शिखांसाठी तीर्थ क्षेत्र आहे. शनिवारी या परिसरात बार्बेक्यु पार्टी आयोजित करण्यात आली होती. परिसरात मांस शिजवणं वर्ज्य असूनही परिसरात मांस शिजवण्यात आलं. तसंच, दारूसेवन करून नाचगाणंही ठेवण्यात आलं होतं. रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत ही पार्टी चालली.
या पार्टीत पाकिस्तानातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. जवळपास 80 जण या पार्टीत होते. या पार्टीचं आयोजन कर्तारपूर कॉरिडोर प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे अध्यक्ष सैय्यद अबु बकर कुरेशी यांनी केल्याची माहिती मिळत आहे. या पार्टीचा व्हिडीओ देखील व्हायरल होत असून त्यानंतर शीख समुदायाने संताप व्यक्त केला आहे.