विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रक मधून 68 लाख 40 हजारांची दारू जप्त, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

मुंबई-गोवा महामार्गावर गस्त घालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एक पांढऱ्या रंगाचा ट्रक अडवला. त्या ट्रकची झडती घेतली असता त्या ट्रकमध्ये 68 लाख 40 हजार रुपयाचे विदेशी मद्य आढळले. कोळसा पावडरच्या गोणींच्या आडोशाला विदेशी मद्याच्या 11,400 बाटल्या लपवून ठेवण्यात आल्या होत्या. उत्पादन शुल्क विभागाने 68 लाख 40 हजार रुपयांची विदेशी दारू 24 लाख रुपये किमतीचा ट्रक आणि सव्वा लाख रुपयांची कोळसा पावडर असा एकूण 92 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क चिपळूण विभागाने राष्ट्रीय महामार्गावर अचानक वाहन तपासणी आणि गस्त घालत असताना मिळालेल्या बातमीवरून वालोपे गावाच्या हद्दीत चिपळूण रेल्वेस्टेशन फाट्याजवळ सापळा रचून एका संशयीत ट्रकला थांबवून झडती. यावेळी ट्रकच्या मागील हौद्यात 20 किलो क्षमतेच्या कोळसा पावडर भरलेल्या एकूण 125 पॉलीथीन गोणी आढळून आल्या. या गोणींच्या आड कागदी पुठ्याच्या बॉक्स मध्ये आईस मॅजिक [ऑरेंज फ्लेवर वोडका] आणि आईस मैजिक [ग्रीन अॅपल वोडका] या दोन ब्रॅण्डच्या 750 मिली. क्षमतेच्या एकूण 950 बॉक्समध्ये 11,400 इतक्या कंपनी सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या विदेशी मद्याची अंदाजे किंमत 68 लाख 40 हजार रुपये आणि ट्रकची अंदाजे किंमत 24 लाख रुपये, कोळसा पावडरची किंमत 12 हजार 500 रुपये आणि विवो कंपनीचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 92 लाख 62 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरून होणारी अवैध मद्यवाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठिकठिकाणी तपासणी नाके व गस्ती मोहिम राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क चिपळूण विभाग राष्ट्रीय महामार्गावर अचानक वाहन तपासणी आणि गस्त घालत होते. त्यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार वालोपे गावाच्या हद्दीत चिपळूण रेल्वेस्टेशन फाट्याजवळ सापळा लावण्यात आला होता. चिपळूणकडून पनवेलच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करत असताना एक संशयीत पांढऱ्या रंगाचा ट्रकला तपासणीसाठी थांबवून झडती घेतली असता ट्रकच्या मागील हौद्यात 20 किलो क्षमतेच्या कोळसा पावडर भरलेल्या एकूण 125 पॉलीथीन गोणी आढळून आल्या. या गोणीच्या आड असलेल्या कागदी पुठ्ठयाच्या बॉक्सची झडती घेतली असता बॉक्समध्ये आईस मैजिक (ऑरेंज फ्लेवर बोडका आणि आईस मॅजिक [ग्रीन अॅपल वोडका ] या दोन ब्रॅण्डच्या 750 मिली. क्षमतेच्या एकूण 950 बॉक्समध्ये 11,400 इतक्या कंपनी सीलबंद बाटल्या आढळून आल्या. हा विदेशी मद्यसाठा गोवा राज्यातून वाहतूक करून आणला असल्याचे निष्पन्न झाले. या मद्याचे उत्पादन गोवा राज्यात झाले असून मद्याच्या बाटल्यांवरील लेबलवर असणारा मजकूर तपासला असता ते M/S Distilled Blended And Bottled by Dreams Spirits, plot no. 23 Industrial Area Maharashtra (For Sale In The State of Maharashtra) तसेच त्यावर एमआरपी नमूद नसलेले असे कागदी लेबल चिकटवलेले दिसून आले.

वाहनचालकाकडील बिल्टीवर मे. ग्रीन अॅग्रो इंडस्ट्रीज नॉर्थ गोवा या कंपनीकडून इंडोनेशियन कोल या वस्तूचे E-Way Bill No. 133858463724 दि. 23-05-2023 मे राधाकृष्ण ट्रेडिंग कंपनी, बी-1, ग्राउंड फ्लोअर, देवी विहार सी.एच. एस.ली. आग्रारोड, लालचौकी, कल्याण पश्चिम, जि. ठाणे, महाराष्ट्र 421301 व इनव्हाईस नं. 2023-24-203 दि. 23-05-2023 असे नमूद असलेली बिल्टी सापडली. बोगस कागदपत्रांच्या आधारे गोवा राज्यातून महाराष्ट्र राज्यात विदेशी मद्यवाहतूक करत असताना हा ट्रक पथकाने ताब्यात घेतला आहे. या ट्रकमध्ये सापडलेला विदेशी मद्यसाठा हा विनापरवाना बेकायदेशीरपणे महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्याने या ट्रकचा चालक सुरेश हरिबा पाटील, रा. मु.पो. शिवाजीनगर, ता. कडेगाव, जि. सांगली याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65[अ] [ई] 90, 81 व 83 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या अवैध विदेशी मद्यवाहतूक करण्यामागे मुख्य सुत्रधार कोण आहे याबाबत वाहनचालक सुरेश पाटील याची कसून चौकशी केली असता त्याचा पुतण्या ओंकार हनमंत पाटील, रा. मलकापूर, अहिल्यानगर, ता. कराड, जि. सातारा हा सर्व व्यवहार करत असल्याचे त्याने सांगितले. या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क चिपळूण विभागाचे निरिक्षक व्ही. एस. मासमार, दुय्यम निरिक्षक जयसिंग खुटावळे, गणेश नाईक, सहाय्यक दुय्यम निरिक्षक राजेंद्र भालेकर, जवान सावळाराम वड यांनी भाग घेतला. तुषार शिवलकर व सिध्दार्थ जाधव यांनी या कारवाईकामी मदत केली. या गुन्ह्याचा पुढील तपास तपासनिरिक्षक व्ही.एस. मासमार करत आहेत.