पुण्यात जन्म, पालकांनी अनाथालयात सोडलं; ‘ती’ बनली ऑस्ट्रेलियाची कॅप्टन अन् ICC ‘हॉल ऑफ फेम’मध्ये मिळवलं स्थान

वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कधीच काही मिळत नाही असे बोलले जाते. अनेकदा गरिबाच्या घरात जन्मलेली, रस्त्यावर राहणारी आणि आई-वडिलांनी नाकारलेली मुलंही मोठा इतिहास घडवतात. आज आपण अशाच एका मुलीबाबत जाणून घेणार आहोत. या मुलीचा जन्म जरी पुण्यात झाला असला तरी ती साता समुद्रापार ऑस्ट्रेलियात पोहोचली, क्रिकेट संघाची कर्णधारही झाली, वर्ल्डकपही जिंकली अन् तिने आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्येही एन्ट्री केली. लिसा स्थळेकर (Lisa Sthalekar) असे या महिला क्रिकेटपटूचे नाव आहे.

आयसीसीच्या वेबसाईटनुसार 13 ऑगस्ट 1979 रोजी लिसा स्थळेकर हिचा जन्म झाला. आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी तिला पुण्यातील ‘श्रीवत्स अनाथालय’मध्ये सोडले. अनाथलयामध्ये लैला असे तिचे नामकरण करण्यात आले. पुढे या इवल्याशा जीवाच्या नशिबाचे मार्ग मिशिगनमधल्या एका जोडप्यापर्यंत गेले.

हरेन (Haren) आणि सूए (Sue) हे स्थळेकर हे अमेरिकन दांपत्य हिंदुस्थानात आले होते. हरेन मूळचे मुंबईचे तर सूए ही इंग्लंडची आहे. त्यांना एक मुलगी होते आणि ते एका मुलाला दत्तक घेण्याच्या उद्देशाने आले होते. याच दरम्यान त्यांची नजर लैलावर पडली आणि तिच्या बोलक्या डोळ्यांच्या प्रेमामध्ये हे स्थळेकर दांपत्य पडले. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांनी लैलाला दत्तक घेतले आणि तिचे नाव लिसा असे ठेवले. तिला दत्तक घेतले तेव्हा ती जेमतेम तीन आठवड्यांची होती.

हरेनने लिसाला क्रिकेटचे प्रशिक्षण दिले. घरासमोरील पटांगणामध्ये लिसाने क्रिकेटचे धडे गिरवले. पुढे शिक्षणासोबत तिने क्रिकेटचे वेडही जपले. ऑस्ट्रेलियातील स्थानिक स्पर्धा खेळता-खेळता ती राष्ट्रीय संघापर्यंत पोहोचली आणि अनेक विक्रम तिने आपल्या नावे केले. 2013 मध्ये वन डे वर्ल्डकप जिंकल्यानंतर तिने निवृत्तीची घोषणा केली.

ऑस्ट्रेलियाकडून ती आठ कसोटी, 125 वन डे आणि 54 टी-20 खेळली. वन डे क्रिकेटमध्ये हजार धावा आणि 100 बळी घेणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 3,913 धावा आणि 229 बळींची नोंद आहे. आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्येही तिला स्थान देण्यात आले.