कर्जमाफीची यादी तालुका सहकार कार्यालयात झळकणार

30
shivsena-with-farmer

सामना प्रतिनिधी, मुंबई

आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्याची यादी पंधरा दिवसांत जाहीर करा अन्यथा गाठ शिवसेनेशी आहे असा इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देताच सहकार विभाग खडबडून जागा झाला. राज्यातील ज्या शेतकऱयांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली आणि कोणाला नाकारली त्याची संपूर्ण यादी दोन दिवसांत सहकार विभागाच्या तालुकास्तरावरील सहाय्यक उपनिबंधक कार्यालयात लावण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. त्यामुळे कोणाला कर्जमाफी झाली, कोणाला का नाकारली याची इत्थंभूत माहितीच सर्वसामान्य शेतकऱयांना उपलब्ध होणार आहे.

शेतकऱयांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने तब्बल 45 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना जाहीर केली होती. त्यानुसार लाखो शेतकऱयांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले होते, मात्र काही शेतकऱयांचे कर्ज माफ झाले तर काहीजण कर्जमाफीसाठी अपात्र ठरले. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये मोठी नाराजी पसरली होती. तसेच आपल्याला का कर्जमाफी झाली नाही यावरूनही त्यांच्यामध्ये गोंधळाची परिस्थिती होती. त्याची गंभीर दखल घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना पीक विमा नाकारणाऱ्या विमा कंपन्यांविरोधात काढलेल्या मोर्चादरम्यान सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्जमाफीची माहिती व्हावी म्हणून त्याची यादी जाहीर करण्याचे आवाहन केले होते.

कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन करण्यासठी प्रत्येक तालुक्यात एक तक्रार निवारण समिती नेमली आहे. सहाय्यक उपनिबंधकांच्या अध्यक्षेखालील या समितीमध्ये जिल्हा बँकेचा एक प्रतिनिधी, लेखापरीक्षक विभागाचा एक प्रतिनिधी आणि सहाय्यक उपनिबंधक कार्यालयातील एक अधिकारी असणार आहे, अशी माहिती सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी दिली.