डोंबिवलीत आजपासून साहित्याचा जागर, पु. भा. भावे साहित्यनगरी सज्ज

वाजतगाजत निघणार ग्रंथदिंडी

हजारो विद्यार्थी, रसिकांचा सहभाग

तीन दिवस कार्यक्रमाची भरगच्च मेजवानी

मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा

ठाणे/डोंबिवली, दि. 2 (प्रतिनिधी) – 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पु.भा. भावे साहित्यनगरी सज्ज झाली असून उद्या शुक्रवारपासून साहित्याचा अनोखा जागर होणार आहे. अनेक नामवंत साहित्यिक, वाचक, प्रकाशक, साहित्य महामंडळाचे सदस्य डोंबिवलीत दाखल झाले असून  उद्या सकाळी वाजतगाजत भव्य ग्रंथदिंडी निघणार आहे. हजारो विद्यार्थी तसेच वाचनप्रेमी या दिंडीत सहभागी होणार असून डोंबिवली नगरी साहित्य जागराने दुमदुमून जाणार आहे.  दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस कविसंमेलन, कथाकथन, परिसंवाद, मुलाखती आदी भरगच्च कार्यक्रम होणार असून त्यानिमित्ताने येथील साहित्यप्रेमींना अनोखी मेजवानी मिळणार आहे.

साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच डोंबिवली नगरीमध्ये ज्येष्ठ समीक्षक, डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली  साहित्य संमेलन भरत आहे.  कल्याण-डोंबिवली महापालिका व आगरी यूथ फोरमच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन केले असून संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील पु.भा. भावे साहित्यनगरीमध्ये भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले नाटय़गृहातही कार्यक्रम होणार असून तेथेही सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संमेलनात 80 फूट लांब व 60 फूट रुंद एवढय़ा आकाराचे भव्य व्यासपीठ असून मागील बाजूस बुकसेल्फ तसेच पुस्तकांचे आकर्षक रॅक तयार केले आहेत. विस्तीर्ण मैदानावर 400 फूट लांब व 240 फूट रुंद आकाराचा सभामंडप असून 12 हजार साहित्यप्रेमी बसू शकतील अशी व्यवस्था केली आहे.

मान्यवरांची उपस्थिती

साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास राज्याच्या विविध भागांतून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुपारी 4 ते 7 या वेळेत हा उद्घाटन सोहळा होणार असून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, प्रख्यात हिंदी कवी विष्णू खरे यांची प्रमुख उपस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्घाटक असून संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मावळते अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे आपल्या अध्यक्षपदाची सूत्रे काळे यांच्याकडे सुपूर्द करतील. या सोहळ्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर, खासदार कपील पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. म.सु. पाटील उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ कवी द.भा. धामणस्कर तसेच अप्पर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचा विशेष सत्कार यावेळी केला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्यांना

काळे झेंडे दाखविणार

कल्याण-डोंबिवली महापालिकेतून 27 गावे वगळून त्याची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामस्थांना दिले होते. मात्र ते न पाळल्याने उद्या होणाऱया साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. मात्र संमेलनाला आम्ही कोणताही अडथळा आणणार नाही याची काळजी घेऊ असे युवक काँग्रेसचे अध्यक्ष  सुधीर पाटील यांनी सांगितले.

आजचे कार्यक्रम

सकाळी 8- ग्रंथदिंडी

सकाळी 10- महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण ह  दुपारी

उद्घाटन सोहळा ह सायंकाळी 7- निमंत्रितांचे कविसंमेलन.

एक कोटीच्या अनुदानाची जाहीरपणे मागणी करणार

– डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी

महाराष्ट्र शासन साहित्य संमेलनाच्या आयोजकांना दरवर्षी  25 लाखांचे अनुदान देत असते. ही रक्कम वाढवून 1 कोटी रुपये करावी अशी लेखी मागणी साहित्य महामंडळाने चार वेळा केली. मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. उद्याच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आपण महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने

1 कोटीच्या अनुदानाची जाहीरपणे मागणी करणार आहोत.

संमेलन यशस्वी होणारच

– गुलाबराव वझे

डोंबिवलीतील साहित्य संमेलन हे सर्वांच्या प्रयत्नाने होत असून सर्व अडचणींवर मात करून आम्ही ते यशस्वी करून दाखवूच. यानिमित्ताने देशाच्या विविध भागांतून येणारे साहित्यप्रेमी, लेखक, कवी यांचे आदरातिथ्य करण्याची संधी  आम्हाला मिळणार आहे.

 

पेन टॉवरचे आकर्षण

डोंबिवलीच्या साहित्य संमेलनात साहित्य पार्कदेखील उभारले असून त्यात पु.ल. देशपांडे, शं.ना. नवरे, कुसुमाग्रज, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे पुतळे उभारले आहेत. संमेलनाच्या मुख्य मंडपात प्रवेश करताच साहित्यप्रेमींना संत ज्ञानेश्वर, गणपती तसेच तुकारामांचे दर्शन होईल. त्याशिवाय  लेखणीच्या आकाराचा अनोखा पेन टॉवर उभारण्यात आला आहे. ज्येष्ठ नेपथ्यकार संजय धबडे यांच्या संकल्पनेतून मंडपातील सजावट करण्यात आली असून पेन टॉवर हा साहित्यरसिकांचा सेल्फी पॉइंटदेखील ठरणार आहे.

कायमस्वरूपी बोधचिन्ह

आतापर्यंत तब्बल 89 साहित्य संमेलने झाली. प्रत्येक संमेलनाची वेगवेगळी बोधचिन्हे साकारण्यात आली होती. मात्र ही बोधचिन्हे संमेलन संपल्यानंतर फारशी स्मरणात राहत नाहीत. हे लक्षात घेऊन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने डोंबिवलीच्या साहित्य संमेलनाचे खंबाळपाडा रोडला कायमस्वरूपी बोधचिन्ह उभारले आहे. संमेलन संपल्यानंतरही हे चिन्ह बघताच प्रत्येकाला 90 व्या साहित्य संमेलनाची आठवण होईल.

 

आपली प्रतिक्रिया द्या