श्रीमद्भगवद्गीता: ७०० श्लोकांतून वाहणारं अलौकिक भाषासौंदर्य

2274

>>गौरी माहुलीकर (निवृत्त प्राध्यापिका, संस्कृत विभाग, मुंबई विद्यापीठ)

प्रस्तावना:

‘भाषासु मुख्या मधुरा गीर्वाणभारती’ अशा संस्कृत भाषेत भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यात कुरुक्षेत्री घडलेला संवाद म्हणजेच सुरमुनिपूजित, विश्ववंद्या भगवद्गीता होय. गीता या सामान्यनामाने सर्व भारतीय हिचे पठण करतात. गीतेला धार्मिक ग्रंथापुरते मर्यादित महत्त्व नाही. संवादाची अभिनव शैली, त्यातील सहजता, माधुर्य, प्रसंगी आढळणारे अलंकार, व्याकरणातील तद्धिते, कृदन्ते, अव्यये, धातुसाधिते, इच्छार्थक रूपे, परोक्ष भूतकाळाची रूपे, एका शब्दासाठी वापरलेले अनेक पर्यायवाची शब्द अशा विविधांगांनी गीतेचा अभ्यास करता येऊ शकतो. असे प्रयत्न फलद्रूप होऊन काही ग्रंथांची निर्मितीही झाली आहे. संस्कृत शिकण्यासाठी गीता व गीता शिकण्यासाठी संस्कृत असा हा उभयविध प्रवास आहे.

शैली:

मुळात गीता संवादात्मक असल्याने यातील शैली भिन्न आहे. दोन मित्रांचा संवाद जसा एकेरी संबोधनात केला जातो तसाच संवाद इथे आहे, मुद्द्यांची नीट मांडणी आहे, तार्किक संगती आहे, एकमेकांसाठी वापरलेली संबोधने आणि हक्काने वापरलेली एकवचने आहेत. ‘रथं स्थापय मेऽच्युत’ असे अर्जुनाचे आज्ञार्थक वचन ऐकून श्रीकृष्ण मुकाट्याने दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ उभा करतो आणि अर्जुनाने केलेला युक्तिवाद शांतपणे ऐकतो. युद्ध न करण्यासाठीची अनेक कारणे अर्जुन देतो व अखेरीस ‘शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्’ म्हणून कृष्णास शरण जातो. जेव्हा कृष्णाने सांख्ययोग सांगून कर्माची महतीही सांगितली, तेव्हा “मला उगीच गोंधळात न टाकता नक्की काय ते सांग (तदेकं वद निश्चित्य ३.२) असे अत्यंत स्पष्टपणे अर्जुन म्हणतो. विश्वरूप पाहिल्यानंतर मात्र त्याच्यात परिवर्तन होते आणि आत्तापर्यंत केलेल्या अनाठायी सलगीबद्दल तो कृष्णाची क्षमा मागतो (११.४१,४२). सर्व गीता सांगून झाल्यावर ’यथेच्छसि तथा कुरु’ (१८.६३) असे मतस्वातंत्र्य व कृतिस्वातंत्र्य कृष्ण अर्जुनाला देतो तेव्हा “करिष्ये वचनं तव” (१८.७३) असे आश्वासन अर्जुनही देतो. मैत्रीभावनेत दुराग्रह, सक्ती नाही, केवळ मित्रबोध आहे आणि हेच संवादमय भाषाशैलीचे यश आहे.

भाषासौंदर्य:

सुभाषितासारखी अनेक वाक्ये गीतेत विखुरलेली दिसतात. भाषणांमधे, लेखांमधे अशा वाक्यांची पखरण केलेली दिसते. धीरस्तत्र न मुह्यति, अन्तवन्त इमे देहाः, नायं हन्ति न हन्यते, समत्वं योग उच्यते, जातस्य हि ध्रुवो मृत्युः, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, योगः कर्मसु कौशलम्, स्वधर्मे निधनं श्रेयः, यदा यदा हि धर्मस्य, संभवामि युगे युगे, श्रद्धावान् लभते ज्ञानम्, गहना कर्मणो गतिः, संशयात्मा विनश्यति, निर्दोषं हि समं ब्रह्म, समबुद्धिर्विशिष्यते, योगक्षेमं वहाम्यहम्, निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्, सत्त्वात्संजायते ज्ञानम्, यो यच्छ्रद्धः स एव सः, पकृतिस्त्वां नियोक्ष्यति अशासारखी अनेक सुवचने गीतेत आहेत. यात केवळ धर्म व तत्त्वज्ञान नाही तर धर्मनिरपेक्ष व्यावहारिक शहाणपण सांगणार्या युक्तीच्या गोष्टी आहेत. प्रसादगुणाने म्हणजे सहजसुलभ, वाचल्यावर समजेल अशा भाषेने गीता नटली आहे. सोपे तरीही माधुर्ययुक्त संस्कृत कसे असावे, याचा गीता जणू वस्तुपाठ आहे.

अलंकारसौंदर्य:

उपमा अलंकार सर्वमान्य व लोकप्रिय आहे. गीतेत हा अलंकार अनेक ठिकाणी येतो. गहनगंभीर तत्त्वज्ञान यामुळे सुलभ वाटते. ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून नवी धारण करतो, त्याचप्रमाणे आत्मा जीर्ण देहाचा त्याग करून नव्या देहात प्रवेश करतो (२.२२) कमळाच्या पानाला ज्याप्रमाणॆ काही चिकटत नाही, त्याप्रमाणे निष्काम करणार्यातला कर्म चिकटत नाही (५.१०). जसा अग्नी धुराने, आरसा धुळीने व गर्भ वारेने वेढलेला असतो, तद्वत ज्ञान काम व क्रोधाने अशी एक सुरेख उपमा ३.३८ मध्ये येते. जरी मानवी मन वार्यााप्रमाणे अत्यंत चंचल आहे तरीही निर्वात प्रदेशात ठेवलेला दिवा कंपित होत नाही त्याप्रमाणे योग्याचे चित्त विचलित होत नाही (६. १९, ३४) अशी सहज समजणारी उपमा आहे. नऊ दारे असणारे देहरूपी नगर (५.१३, ८.१२), १५ व्या अध्यायात असंगरूपी शस्त्राने तोडता येणारा, विषयरूपी अंकुर असणारा अश्वत्थ अशी रूपकाची सुंदर उदाहरणे आहेत तर ११ व्या अध्यायात अतिशयोक्तीवर आधारित विश्वरूपदर्शन आहे, जे त्याच्या वर्णनामुळे अर्जुनाबरोबर वाचकांच्याही मनःचक्षूंसमोर उभे ठाकते.

तद्धितरूपे व कृदन्तरूपे:

एखाद्या नामाला प्रत्यय लावून दुसरे नाम तयार होते त्याला तद्धित म्हणतात. हे प्रत्यय मतुप् मयट्, अण्, त्व, ठक्, इन् असे विविध प्रकारचे आहेत. गीतेच्या पहिल्या अध्यायात ही रूपे विपुलतेने दिसतात. उदा. पाण्डवाः (पण्डूराजाचे पुत्र), सौभद्र, द्रौपदेयाः, शैब्यः सौमदत्तिः, धार्तराष्ट्राः, वार्ष्णेय, कौन्तेय, पार्थ हे सर्व शब्द वंशज म्हणून, पुत्र म्हणून वापरले आहेत. संपूर्ण गीतेत असे शेकडो शब्द वेचून काढता येतील. याशिवाय भगवान्, ज्ञानवान् श्रद्धावान्, आत्मवन्तं असे मत्वर्थीय प्रत्यय लागून झालेले शब्द आहेत.

धातूला एखादा प्रत्यय लावून जे नाम/अव्यय तयार होते त्याला कृदन्त असे म्हणतात. पूर्वकालवाचक त्वान्त/ल्यबन्त अव्यये, हेत्वर्थक तुमन्त अव्यये, वर्तमानकालवाचक, भूतकालवाचक, भविष्यकालवाचक धातुसाधित विशेषणे असे अनेक प्रकार यात येतात. ११ व्या अध्यायात पुष्कळ कृदन्तरूपे आढळतात, जशी; दृष्ट्वा, उक्त्वा, श्रुत्वा, नमस्कृत्वा, प्रणम्य, ज्ञातुं, द्रष्टुं, प्रवेष्टुं, दुर्निरीक्ष्यं, ईड्यं, वेदितव्यं, दीप्तं, विस्मिताः, निहताः, प्रव्यथितं, प्रोक्तवान्, विषीदन्तं, तपन्तं, ग्रसमानः, त्वरमाणाः, वेपमानः, वेत्ता इत्यादी. ५ व्या अध्यायातील एका श्वासात म्हणायला कठीण असा श्लोक ’पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन्। प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि।’ यातील वर्तमानकालवाचक धातुसाधितांसाठी प्रसिद्ध आहे.

सन्धी, समास व व्युत्पन्न धातुरूपे:

संस्कृत व्याकरणाचे अविभाज्य घटक म्हणजे स्वर, व्यंजन व विसर्गसन्धी आणि तत्पुरुषादी समास. या सर्वांची असंख्य उदाहरणे गीतेत आहेत, यामुळे यांचे अध्ययन गीतावाचनाने अनायास होते. सुखदुःखे, लाभालाभौ, जयाजयौ, शुक्लकृष्णे, कार्याकार्ये, भयाभये सारखे द्वंद्वसमास, निस्त्रैगुण्य, निर्योगक्षेम, निर्द्वन्द्व, निष्काम, निर्विकारः, अयुक्तः, अधर्मः सारखे नञ समास, तत्पुरुषसमासाचे अगणित शब्द गीतेत ठायीठायी येतात. अकुर्वत, अब्रवीत्, अभ्यहन्यन्त, अभवत्, व्यनुनादयन् सारखी प्रथमभूतकाळी रूपे, दध्मौ, उवाच, आश्वासयामास यासारखी द्वितीयभूतकाळाची रूपे, युयुत्सवः, चिकीर्षवः जिज्ञासुः, प्रेप्सुः, जिजीविषामः सारखी इच्छार्थकरूपे, शोषयति, नियोजयसि, मोहयसि, विचालयेत् सारखी प्रयोजकरूपे, लेलिह्यसे हे पौनःपुन्यार्थकरूप अशी व्याकरणातील सर्वप्रकारची रूपे गीतेत आढळतात.

उपसंहार:

शब्दसंपत्ती हे भाषेचे वैभव मानले जाते. एका शब्दासाठी अनेक पर्यायवाची शब्द वापरणे लेखकाचे कौशल्य समजले जाते. सैन्य या अर्थी अनीकं, चमूम्, सेना, तसेच युद्धासाठी, समिति, रण, आहव, अयन असे शब्द पहिल्याच अध्यायात येतात. स्वजन, आप्तस्वकीयांमध्ये कुणाकुणाचा समावेश करता येईल तर पितॄन्, पितामहान्, आचार्यान्, मातुलान्, भ्रातॄन्, पुत्रान्, पौत्रान्, सखीन्, श्वशुरान्, सुहृदः, श्यालाः, सम्बन्धिनः असे अनेक शब्द व्यासांनी वापरले आहेत. याहून अधिक नाते काय असू शकेल? शलाकान्यायाने या लेखात काही उदाहरणे दिली आहेत, जिज्ञासूंना अध्यायशः व्याकरणाचा अथवा भाषेचा अभ्यास करण्यासाठी प्रेरित करण्याचा हा अल्प प्रयत्न मानावा. “व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्” असे जे म्हटले जाते ते म्हणूनच सर्वार्थाने पटते.

आपली प्रतिक्रिया द्या