संमेलनातील साहित्याविश्व

21

<< शुभांगी बागडे >>

सध्या मराठी साहित्यविश्वाची चर्चा रंगत आहे ती ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने. मराठी साहित्य संमेलन हे कायमच त्यातील साहित्यिक विषयांपेक्षा इतर वादविवादांनी जास्त रंगले जाते आणि आपोआपच त्याची चर्चा होते. मात्र या वादविवादाला फारसं महत्त्व न देता सारस्वतांच्या या मेळ्याच्या निमित्ताने साहित्य-संस्कृतीविषयी जिव्हाळा जपणारा सामान्यजन या विश्वात दोन-चार घटका रमतो. जानेवारी-फेब्रुवारीचा हा काळ खऱ्या अर्थाने अनेक सांस्कृतिक, वैचारीक जडणघडणीसाठी पोषक ठरतो तो या काळात होणाऱ्या विविध साहित्य संमेलनं, पुस्तक मेळा म्हणजेच लिटरेचर फेस्टिव्हलमुळे. आत्तापर्यंत झालेल्या आणि होणाऱ्या या लिट फेस्टसचा घेतलेला हा वेध. 

साहित्यिकांशी चर्चा घडवून आणणं, पुस्तकांच्या विषयांबद्दल मंथन करणं आणि त्या विषयांचा वास्तवाशी जो संबंध आहे त्याबद्दल इतरांनाही बोलतं करणं हे काम गेल्या दहा वर्षांत ठिकठिकाणचे ‘लिटफेस्ट’ (लिटरेचर फेस्ट) करत आहेत. यात जगभरात प्रसिद्ध झालेला आणि भारतीय साहित्याला जगाच्या व्यासपीठाजवळ नेणारा लिटरेचर फेस्टिव्हल म्हणजे जयपूर फेस्टिव्हल. सन २००६ पासून दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटी जयपूरमध्ये हे साहित्य संमेलन भरतं. जयपूर लिटफेस्ट या नावाने प्रसिद्ध असलेल्या संमेलनात जागतिक किर्तीचे नामवंत लेखक सहभागी होतात. अवघ्या काही वर्षात या संमेलनाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं स्थान निर्माण केलं आहे. यावर्षी जयपूरच्या डिग्गी पॅलेसमध्ये झालेल्या या संमेलनात गवगवा होता तो बुकर पुरस्कार मिळालेल्या लेखक मंडळींचा. हिंदुस्थानच्या विविध भाषिक लेखक मंडळींचा यात आवर्जून सहभाग असतो. साहित्यक्षेत्रातील दिग्गजांबरोबर चित्रपट, बॉलिवूड कलाकार, मान्यवर पत्रकार यांचाही सहभाग या संमेलनात असतो. याचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे १५० पेक्षा अधिक चर्चासत्रं यानिमित्ताने आयोजित केली जातात. या पातळीवर वैचारिक, सांस्कृतिक देवाणघेवाण होणारं हे संमेलन वैशिष्टय़पूर्णच आहे.

जयपूर लिटफेस्टप्रमाणेच गेल्या काही वर्षात चर्चिलं जाणारं संमेलन म्हणजे मुंबईतील टाटा लिटरेचर फेस्टिव्हल. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटास नरिमन पॉइंट येथील ‘एनसीपीए’मध्ये हे सहावे टाटा लिटरेचर फेस्टिवल संपन्न झाले. जगभरातील १४ देशांतील १२० विचारवंत व लेखकांचा सहभाग आणि साहित्य क्षेत्राला दिशा देणारी चर्चा असा एकत्रित अनुभव यावेळी मुंबईतील वाचकांना घेता आला. पुस्तकांचे प्रकाशन,  बालसाहित्यावरील उपक्रम अशा साहित्यिक घडामोडींना वेगळ्या ढंगात यावेळी सादर करण्यात आलं. चित्रकार, गायक आणि अभ्यासू राजकारणी यांना या उत्सवात स्थान देत लोकप्रिय मंडळी व मान्यवरांच्या प्रकट मुलाखतींद्वारे खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत हा फेस्टिव्हल पोहोचला आहे.

चेन्नईमध्ये पार पडणारा हिंदू लिट फॉर लाइफ हा उत्सवही अशाच धर्तीवर आयोजित केला जातो. जानेवारीत होणाऱ्या उत्सवास तितकाच प्रतिसाद लाभतो.

या संमेलनांच्या निमित्ताने पुस्तकांचं मोहमयी जग पुस्तकवेड्यांसाठी खुलं होतं. दुर्मिळ झालेली, सहसा पुस्तकांच्या दुकानात न सापडणारी पुस्तकं  वेगळ्या विषयावरील लेखन असलेली पुस्तकं या संमेलनांच्या निमित्ताने पुन्हा गवसतात. यामुळेच चर्चासत्रं, परिसंवाद, लेखकांशी संवाद याबरोबरच पुस्तकांच्या खरेदीसाठी वाचक हमखास संमेलनांना हजेरी लावतात. यातली काही संमेलनं तर पुस्तकमेळा म्हणूनच भरवली जातात. यातलंच एक म्हणजे नवी दिल्ली विश्व पुस्तक मेळा. ‘नॅशनल बुक ट्रस्ट’तर्फे भरवल्या जाणाऱ्या या मेळ्याला म्हणूनच उदंड प्रतिसाद लाभतो. दरवर्षी जानेवारीच्या मध्यात हा पुस्तकमेळा आयोजित केला जातो. नेमके कोणत्या साहित्याला जास्त प्रतिसाद आहे, सध्याचे साहित्य कोणते विचारप्रवाह रुजू पाहात आहे याचा अभ्यास या पुस्तकमेळ्याच्या निमित्ताने नक्कीच होऊ शकतो. देश-विदेशांतील प्रकाशक, प्रकाशन व्यवसायातील सामाजिक संस्था आणि विक्रेते अशांचे तब्बल दोन हजारांहून अधिक छोटेमोठे स्टॉल इथे असतात. पुस्तक विक्रीपेक्षा वाचकांना साद घालून प्रतिसाद देण्यास भाग पाडण्यास हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असतो.

दिल्लीच्या पुस्तकमेळ्याप्रमाणेच कोलकात्याचा ‘बोईमेला’ही तितकाच लोकप्रिय आहे. या पुस्तकमेळ्यात ग्रंथविक्री आणि साहित्यप्रेम या दोहोंनाही तितकंच प्रेम लाभतं. यामुळेच हा पुस्तकमेळाही आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय ठरला आहे. जगभरातही ठिकठिकाणी असे साहित्यमेळावे होत आहेत व त्यांना प्रतिसादही लाभत आहे. यात फ्रँकपर्ट पुस्तक मेळा, इस्तंबूल फेस्टिव्हल, सिंगापूर रायटर्स फेस्ट, व्हेनिस लिटररी फेस्टिव्हल यांचा उल्लेख करायला हवा.

साहित्य संमेलनं म्हणजे आपल्या संस्कृतीला, अभिजाततेला जतन करणारा मेळावा. ग्रंथविक्री-प्रदर्शन, परिसंवाद- मुलाखती- कविसंमेलन  यांच्या माध्यमातून आपण एक सृजनात्मक बीज पुढे घेऊन जात असतो. यातली नवनिर्मिती म्हणजे आपल्या संस्कृतीचा आरसा, असंच म्हणायला हवं.

 

आपली प्रतिक्रिया द्या