बाप्पाच्या मिरवणुकीत ‘बँडवाला भक्त’च भाव खाऊन गेला

69

>>विशाल अहिरराव । अंबरनाथ

आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला भक्तांनी अनंतचतुर्दशीच्या दिवशी मोठ्या आनंदात, उत्साहात, जल्लोषासह ‘पुढल्या वर्षी लवकर या!’ अशा घोषणा देत निरोप दिला. बाप्पाच्या मिरवणुका कॅमेऱ्यात टीपत असताना आम्हाला बाप्पाचा एक बँडवाला बालभक्त दिसला आणि त्याचा उत्साह आम्ही कॅमेऱ्यात कैद केला.

अंबरनाथमध्ये सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीवेळी तो एका भिंतीच्या कठड्यावर उभं राहून गणपती बाप्पा मोरया… पुढल्या वर्षी लवकर या… अशा घोषणा देत होता. आजूबाजूच्या एखाद्या झोपडीत राहणारा होता. विशेष म्हणजे त्या छोट्या मुलाच्या गळ्यात एक पाण्याची कॅन होती. त्याच्या हातात साध्या काठ्या होत्या. गळ्यात अडकवलेल्या कॅनला बँड समजून तो जोरजोराने काठ्या आपटत होता. अर्थातच आजूबाजूला वाजणाऱ्या बँडमध्ये त्याच्या त्या बँडमधला आवाज नाही म्हणण्यासारखाच होता. त्याच्याकडे कुणाचं लक्षही नव्हतं. पण त्याला त्याचं काही नव्हतं. बालभक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंदी भाव, उत्साहानं डोलणार मन पाहून त्याची ही भक्ती बाप्पाला भावलीच असेल, असंच त्याच्याकडे पाहताना जाणवत होतं.

बाप्पा तुझ्या भक्तीत तो त्याचं अठराविश्व दारिद्र्याचं दु:ख विसरून, आपल्याजवळ असलेल्या वस्तूंमधून काही क्षण का असेना सुखाचा पूर्ण आनंद घेत होता. गणपती बाप्पा तू खरोखर सुखकर्ता-दुखहर्ता आहेस ते या बालभक्ताच्या देहबोलीवरून सहज दिसतं होतं. तेव्हा बाप्पा अशा असंख्य भक्तांसाठी तुम्ही पुढल्या वर्षी लवकर या…

व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा…

आपली प्रतिक्रिया द्या