
चॉकलेट घशात अडकल्याने एक वर्षाच्या कोवळ्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सातारा शहरालगतच्या कर्मवीरनगर, कोडोली येथे रविवारी रात्री घडली. शर्वरी सुधीर जाधव असे त्या बालिकेचे नाव आहे.
शर्वरी जाधव या मुलीला तिच्या शेजारी राहणाऱया एका लहान मुलीने जेलीचे चॉकलेट खाण्यास दिले. शर्वरीने चॉकलेट तोंडात टाकल्यानंतर ते तिच्या घशात अडकल्याने ती खोकू लागली. श्वास कोंडल्याने ती बेशुद्ध पडली. ही बाब तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. सातारा जिल्हा शासकिय रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. साळुंखे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे. मुलीचा मृत्यू झाल्याचे समजताच आईने केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.