पाण्याने भाजते कातडी, दुर्धर आजाराने त्रस्त इवीची चक्रावून टाकणारी कहाणी

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

लहान मुलांना आंघोळीला नेले की पाण्यात खेळायला मिळणार या विचारानेच ते खुश होतात. खेळण्यांपेक्षाही पाण्यासोबत खेळायला मुलांना जास्त आवडते. मात्र अमेरिकेतील दीड वर्षाच्या इवी अॅगेरमनसाठी पाणी म्हणजे शाप ठरत आहे. पाण्याचा तिच्या शरीराच्या त्वचेला स्पर्श होताच इवीला भाजल्यासारखा त्रास होऊ लागतो. गोरी गोरी पान असलेल्या बाहुलीसारख्या दिसणाऱ्या इवीच्या त्वचेला पाणी लागताच अंगावर लाल चट्टे उठायला सुरुवात होते आणि मग त्या इवल्याश्या जिवाला अक्षरश: मरण यातना सहन कराव्या लागतात. इवीला फक्त आंघोळीच्यावेळीच नाही तर रडल्यामुळे डोळ्यातून येणाऱ्या अश्रुंमुळे, शरीराला येणाऱ्या घामामुळे देखील त्रास होतो.

अमेरिकेतील मिनेसोटा शहरात राहणाऱ्या ब्रिटनी व डॅनियल अॅगेरमन यांना दीड वर्षापूर्वी गोंडस मुलगी झाली. सुरुवातीच्या दिवसात इवी सामान्य मुलांसारखीच दररोज आंघोळ करायची. पण इवी एक वर्षाची झाली त्यानंतर एका दिवशी आंघोळीसाठी पाणी अंगावर ओतल्यावर इवीला भाजल्यासारखे वाटू लागले. वेदनेने ती किंचाळायला लागली. काही क्षणातच तिच्या त्वचेवर लाल चट्टे उठू लागले. इवीच्या आईने स्थानिक डॉक्टरांना दाखवले मात्र त्यांना त्यावर निदान करता आले नाही. मात्र दुसऱ्या दिवसी पुन्हा तोच प्रकार घडल्याने इवीच्या आईने तिला तज्ञ डॉक्टरांकडे नेले. तिथे तिच्या चाचण्या केल्या तेव्हा इवीला ‘अक्वाजेनिक अर्टीकारिया’ हा आजार असल्याचे निदान झाले. हा आजार असलेल्या व्यक्तींना पाण्याची अॅलर्जी असते. पाण्यामुळे त्यांच्या शरीरावर भाजल्यासारखी जळजळ होते. कधी कधी ही जळजळ पंधरा मिनीटे ते तासभर देखील राहते.

“इवीला आंघोळ घालायला गेले की ती त्रास होणार हे लक्षात येताच रडायला लागते. त्यामुळे आम्ही आता तिला आठवड्यातून दोनदाच आंघोळ घालतो. पण तिला आंघोळ घालताना मला माझ्या काळजावर दगड ठेवावे लागतात. तिचे आोरडणे, रडणे हे सहन करण्यापलिकडे आहे. खूप त्रास होतो तिला असे रडताना बघून. या आजारावर औषधं आहेत पण ती देखील जास्त घेतली की इवीला त्रास होतो. सध्या डॉक्टर इवीच्या या आजारावर संशोधन करत आहेत. मला आता फक्त एकच भीती आहे की भविष्यात जर हा आजार वाढला आणि इवीला पाणी पिताना देखील त्रास झाला तर काय होईल माझ्या मुलीचे, असे इवीच्या आईने प्रसारमाध्यमांना सांगितले.