बांगलादेशचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात बांगलादेशच्या संघाने धमाल उडवली असून पहिल्या कसोटीत यजमानांचा दारूण पराभव केला, तर दुसऱ्या कसोटीतही आघाडी घेतली आहे. रावळपिंडीमध्ये सुरू असलेल्या या कसोटीबाबत शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पाकिस्तानने दुसऱ्या डावात 5 विकेट्स गमावून 80 धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा संघ 92 धावांची आघाडीवर असून सामन्याचा दीड दिवस बाकी आहे. पाकिस्तानचा डाव लवकर गुंडाळल्यास बांगलादेशला हा कसोटी सामना जिंकण्याचीही नामी संधी आहे.
दुसऱ्या कसोटीमध्ये एकवेळ बांगलादेशची अवस्था 6 बाद 26 अशी बिकट झाली होती. मात्र यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास याने शतकीय खेळी करत संघाला 250 धावांचा टप्पा ओलांडून दिला. लिटन दासने पाकिस्तानच्या गोलंदाजांची चौफेर धुलाई करत 138 धावांची ऐतिहासिक खेळी केली आणि एका खास विक्रमाला गवसणी घातली.
लिटन दास हा बांगलादेशच्या क्रिकेट संघातील हिंदू खेळाडू आहे. स्वत:ला कृष्णभक्त म्हणवणाऱ्या लिटन दास याने 228 चेंडूत 138 धावांची खेळी केली. लिटन दास आणि मेहिदी हसन मिराजने (78) सातव्या विकेटसाठी केलेल्या 165 धावांच्या भागीने बांगलादेशला संकटातून बाहेर काढले. या खेळीदरम्यान त्याने 4 षटकार आणि 13 चौकारही ठोकले.
147 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं
लिटन दासच्या या शतकाने कसोटी क्रिकेटमध्ये नवीन विक्रमाची नोंद झाली आहे. 50 धावांच्या आत आघाडीचे 5 फलंदाज गमावल्यानंतरही तीन वेळा शतकी खेळी करणारा लिटन दास पहिल्या खेळाडू ठरला आहे. याआधी लिटन दास याने 2021 मध्ये चटगाव कसोटीत पाकिस्तान आणि 2022 मध्ये मिरपूर कसोटीत श्रीलंकेविरुद्ध असा कारनामा केला होता. चटगाव कसोटीत दासने शतकी खेळी केली तेव्हा बांगलादेशची अवस्था 4 बाद 49 अशी, तर मिरपूर कसोटीत शतक ठोकले तेव्हा 5 बाद 24 अशी होती.
कृष्णभक्त दास
लिटन दास हा कृष्णभक्त असल्याने अनेकांना माहिती नसेल. तो स्वत:ला कृष्णाचा भक्त म्हणतो. इन्स्टाग्रामच्या बायोमध्येही त्याने याचा उल्लेख केलेला आहे.