युवराज, धोनीचे शतक; इंग्लंडपुढे ३८२चे आव्हान

20

सामना ऑनलाईन । कटक

कटकमध्ये इंग्लिश गोलंदाजांची धुलाई करत युवराज सिंगने १५० धावा कुटल्या. धोनीने त्याला उत्तम साथ देत शानदार शतक झळकावले. युवी आणि धोनीच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर हिंदुस्थाने ५० षटकांत ६ गडी गमावून ३८१ धावा केल्या आणि इंग्लंडपुढे ५० षटकांत ३८२ धावा करण्याचे आव्हान ठेवले.

इंग्लंडच्या वोक्सने सलामीवीर लोकेश राहुल (५ धावा), कर्णधार विराट कोहली (८ धावा) आणि दुसरा सलामीवीर शिखर धवन (११ धावा) यांना बाद केले. आघाडीचे तीन फलंदाज २५ धावांतच तंबूत परतल्यामुळे हिंदुस्थानचा संघ दबावात आला होता. मात्र युवराज आणि माजी कर्णधार धोनी यांनी चौथ्या विकेटसाठी २५६ धावांची भागीदारी रचली. युवी-धोनीच्या झंझावातापुढे इंग्लिश गोलंदाजीचा पालापाचोळा झाला.

युवराज १५० धावा करुन वोक्सच्या चेंडूवर बटलरच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. नंतर शतकवीर धोनीने सामन्याची सूत्र हाती घेतली.

प्लंकेटने केदार जाधव (२२ धावा) आणि धोनीला  (१३४ धावा) बाद केले. नंतर पंड्या (नाबाद १९ धावा) आणि जाडेजाने (नाबाद १६ धावा) विकेट जाणार नाही याची काळजी घेत झटपट धावा केल्यामुळे हिंदुस्थानने ५० षटकांत ३८१ धावांची मजल मारली.

………………………

हिंदुस्थानने कटकच्या मैदानावरील आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या उभी केली.

कॅन्सरमधून बरा झालेला युवराज पुन्हा एकदा फॉर्मात आला आहे. याआधी २०११ मध्ये विंडीज विरोधात ११३ धावा करणाऱ्या युवीने तब्बल ६ वर्षांनंतर कटकमध्ये इंग्लंडविरोधात १५० धावा करुन वन डे कारकिर्दीतले १४ वे शतक साजरे केले.

धोनीने हिंदुस्थानमध्ये ४ हजार धावा करण्याचा पराक्रम केला. हिंदुस्थानच्या मैदानात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने ६९७६ धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर धोनी आहे.

धोनीने वन डे क्रिकेटमध्ये २०० षटकार मारण्याचा पराक्रम केला.

धोनीने वन डे कारकिर्दीतले दहावे शतक झळकावले.

 

आपली प्रतिक्रिया द्या