‘लिव्ह इन…’मध्ये बदनामीची धमकी, पोलीस ठाण्यातील तडजोड अंगाशी

41

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

फेसबुकवर दोघांची ओळख झाली. भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिपमध्ये दोघे तीन महिने सोबत राहिले. दोघांचे एकमेकांशी संबंध आल्यावर महिलेने बदनामी करण्याची धमकी दिली. प्रकरण मिटवण्यासाठी डॉन व एका लेडी डॉनने १२ लाखांत पोलीस ठाण्यात तडजोड केली. करारनामा केल्यानंतरही महिलेने पुन्हा दोन लाखांची खंडणीची मागणी केल्याने तिच्याविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स कॉलनीतील ४० वर्षीय महिलेचे एका ट्रॅव्हल्स मालकासोबत फेसबुकवर प्रेमसंबंध जुळले. प्रेमात रूपांतर झाल्यावर दोघे तीन महिने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सोबत राहिले. घरगुती कारणे तसेच मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी महिलेने ट्रॅव्हल्स मालकाकडून दहा लाख उकळले. त्यानंतर महिलेच्या चारित्र्यावर संशय आल्याने त्याने महिलेला टाळणे सुरू केले. याची कुणकुण लागताच महिलेने बदनामी करण्याची धमकी देत पुन्हा दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली. दोन लाख न दिल्यास बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. महिला सतत बदनामी करण्याची धमकी देत खंडणीची मागणी करत असल्याने ट्रॅव्हल्स मालकाने महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपनिरीक्षक शेख रफीक करत आहे.

डॉन व लेडी डॉनने १२ लाखांत केली तडजोड
ट्रॅव्हल्समालक भीक घालत नसल्याने महिला कैसर कॉलनीतील एका डॉनकडे गेली. महिला डॉनकडे गेल्याचे समजताच ट्रॅव्हल्समालक माजी नगरसेविका असलेल्या लेडी डॉनकडे गेला. दोन्ही डॉन पोलीस ठाण्यात पोहोचले. ठाण्यात बसून त्यांनी तोडगा काढत १२ लाखात तडजोड केली. तडजोड झाल्यानंतर महिलेला पाच लाख रुपये देऊन तिच्याकडून ‘मी ट्रॅव्हल्स मालकासोबत माझ्या मर्जीने संबंध ठेवले होते. मी आता या पुढे त्याची बदनामी करणार नाही. तसेच कोणत्याही पोलीस  ठाण्यात तक्रार करणार नाही.’ असा लेखी नोटरी करारनामा करून घेतला व प्रकरण मिटवले. बारा लाखांत सौदा झाल्यानंतर पाच लाखच हातात पडल्याने महिलेने पुन्हा ट्रॅव्हल्स मालकाविरुद्ध तक्रारी देत जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फहिम हाश्मी यांनी बनवाबनवी केल्याची तक्रार आयुक्तांकडे दिली. प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून अखेर जिन्सी पोलिसांनी त्या महिलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्या महिलेने यापूर्वी घर रिकामे करण्यावरून तसेच खोटेनाटे आरोप करून अनेकांकडून खंडणी वसूल केल्याची चर्चा जिन्सी ठाण्यात होती.

आपली प्रतिक्रिया द्या