टीम इंडिया आणखी एका कसोटी विजयासाठी सज्ज

25

हैदराबाद – बांगलादेश व हिंदुस्थान यांच्यातील ऐतिहासिक एकमेव कसोटी लढत चौथ्या दिवसाअखेर रोमांचक अवस्थेत पोहचली आहे. लढतीच्या पाचव्या व अखेरच्या दिवशी यजमान हिंदुस्थानला ९० षटकांत ७ फलंदाजांना बाद करावे लागेल, तर पाहुण्या बांगलादेशला ३ बाद १०३ अशी मजल मारल्यानंतर आणखी ३५६ धावांची गरज आहे. मात्र मोठय़ा आव्हानाचे दडपण आणि पाहुण्यांच्या तीन फलंदाजांना तंबूत परतावणारे रविचंद्रन अश्विन व डावखुरा रवींद्र जाडेजा यांचा बहरलेला फॉर्म पाहता पाहुण्यांना लढत वाचवण्यासाठी शर्थीची झुंज द्यावी लागणार हे मात्र निश्चित.

आज चौथ्या दिवशी कर्णधार मुशफिकरने आपले कसोटीतले पाचवे शतक झळकावत संघाला पहिल्या डावात सर्व बाद ३८८ अशी काहीशी समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. मुशफिकरने २६२ चेंडूंचा सामना करीत १६ चौकार व २ षटकारांची नोंद करीत १२७ धावांची खेळी केली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पाहुण्यांना फॉलोऑन न देत २९९ धावांच्या आघाडीत लक्षणीय भर टाकण्याचे काम संघाकडून करून घेतले. षटकामागे ५.४ धावांच्या सरासरीने टीम इंडियाने दुसऱया डावात ४ बाद १५९ (घोषित) अशी मजल मारली आणि पाहुण्यांपुढे विजयासाठी ४५८ धावांचे आव्हान ठेवले.

आपली प्रतिक्रिया द्या