सोनिया गांधींच्या भेटीनंतर शरद पवारांची पत्रकार परिषद

2859
sharad-pawar

राज्यात सत्तास्थापनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट सोमवारी नवी दिल्लीत झाली. या दोघांमध्ये तब्बल 45 मिनिटे चर्चा झाली. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच हा या बैठकीतील प्रामुख्याचा मुद्दा होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास शरद पवार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. पवार आणि सोनिया यांच्यात तब्बल 45 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीनंतर बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी हे देखील उपस्थित होते. सोनिया गांधी अन्य काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत. आम्ही राज्यातील राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत, असेही पवार यावेळी म्हणाले.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने किमान समान कार्यक्रम निश्चित केला असून सोमवारी पवार–सोनिया यांच्यात त्यावर चर्चा झाली. तत्पूर्वी रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आणि कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, नवाब मलिक असे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना नवान मलिक यांनी सोमवारी शरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेतील हे स्पष्ट केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या