आजारी वडिलांसाठी यकृत दान करण्याची परवानगी द्या!अल्पवयीन मुलीची हायकोर्टात याचिका

यकृताच्या आजाराने ग्रस्त असलेल्या वडिलांना आपल्या यकृताचा काही भाग दान करण्यासाठी 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने पुढाकार घेतला आहे. मात्र कायद्यामुळे लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यास अडचणी येत असल्याने दाद मागण्यासाठी मुलीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत परळच्या ग्लोबल रुग्णालयाला मुलीचा अर्ज दाखल करून घेण्याचे आदेश दिले तसेच त्यावर तत्काळ निर्णय घेण्यास रुग्णालय प्रशासनाला बजावले.

अल्पवयीन मुलीच्या वडिलांना यकृताचा विकार जडला असून लिव्हर ट्रान्सप्लांटची आवश्यक आहे. त्यासाठी मुलीने स्वतःच्या यकृताचा काही भाग आपल्या आजारी वडिलांना देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 नुसार अल्पवयीन मुलगी अवयवदान करू शकत नाही. त्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे या मुलीने आपल्या आईच्या माध्यमातून हायकोर्टात अ‍ॅड. तपन थत्ते यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने प्रियभूषण काकडे यांनी सांगितले की, ग्लोबल रुग्णालयाच्या अधिकृत समितीकडून तसा कोणताच प्रस्ताव सरकारकडे आलेला नाही. ग्लोबल रुग्णालय प्रशासनाने नकार दिला तरी सरकारचा स्वतंत्र निर्णय असू शकतो. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. तपन थत्ते यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, रुग्णालय प्रशासन अवयवदानसंदर्भात अर्ज स्वीकारत नाही. त्यामुळे अवयवदानाची प्रक्रिया होणार की नाही त्याबाबत स्पष्टता नाही. खंडपीठाने रुग्णालय प्रशासनाने अल्पवयीन मुलीच्या अर्जावर 6 मेपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.