भारनियमनाने वैतागलेल्या मनमाडकरांनी अधिकाऱ्यांना कोंडले

31

सामना ऑनलाईन, मनमाड

मनमाड शहरात अघोषित भारनियमनाच्या नावाखाली रोज सलग १० ते १२ तास भारनियमन केले जात असल्याने संतापलेल्या मनमाडकरांच्या संतापाचा बांध आज फुटला. त्यांनी महावितरणाच्या येवला रोडवरील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेऊन तेथील अधिकाऱ्यांना त्यांचाच कार्यालयात कोंडून आपला हिसका दाखवला तीव्र घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

गुरुवारी दिवसाची सुरुवात झाली ती भारनियमनाने अगोदरच प्रचंड उष्म्याने नागरिक हैराण झाले. महिन्याच्या उष्म्याचा तडाखा प्रचंड वाढला आहे. शहराचे तापान ४१ अंशांवर होते. वातावरणात जोरदार वारे वाहू लागल्याने तापमान काहीसे घसरले होते. पण आता तापमानाचा उतरलेला पारा पुन्हा चढू लागला. गत दोन दिवसांत तापमान ४ अंशाने वाढले आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरण तयार होऊन मोठ्या प्रमाणावर उष्मा वाढला. रणरणत्या उन्हाने नागरिक हैराण झाले होते. पहाटे ५.३० ला बत्ती गुल झाली आणि मनमाडकरांची झोप उडाली. त्यानंतर सकाळी ९ वाजल्यापासून भारनियमन सुरू झाले. ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कायम होते. दिवसभर रणरणते उन, लाइट नसल्याने घरात बसवेना. पंखे बंद, कुलर बंद, शिवाय दिवसभर वीज खंडित झाल्याने शासकीय- निमशासकीय कार्यालयाच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला. अनेक कार्यालयात कामे होऊ शकले नाही.

त्यामुळे नागरिकांच्या संयमाचा पारा सुटला. शुक्रवारी सकाळी आययूडीपी ईदगासह ठिकठिकाणच्या नागरिकांनी महावितरणच्या कॅम्पमधील विभागीय कार्यालयात जाऊन तीव्र घोषणाबाजी सुरू केली आणि या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराचे शटर लावून घेतले. महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोंडले व तीव्र निदर्शने सुरू केली. आप्तकालीन भारनियमन बंद कराच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शटर उघडले आणि आंदोलक व महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल नलावडे, रिपाइंचे कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन, शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर बोरसे, अहमद मिर्झा बेग, मा. नगरसेवक दिलीप तेजवाणी, फिरोज शेख, प्रकाश कुलकर्णी, योगेश निकाळे आदींसह ठिकठिकाणचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या आप्तकालीन भारनियमनामुळे सर्वच जण त्रस्त झाले आहे. उद्योग-व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. प्रामुख्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. त्यामुळे आप्तकालीन भारनियमनाचा अतिरेक थांबावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शासकीय-निमशासकीय कार्यालय कामकाजावर परिणाम
यापूर्वी ११ ते २ असे तीन तास भारनियमन घेतले जात होते. त्यानंतर सकाळी तीन तास व सायंकाळी तीन तास असे भारनियमन सुरू झाले. गेल्या तीन दिवसांपासून अघोषित भारनियमनाचा अतिरेक झाला. पहाटे ५.३० ते ७ आणि सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सलग ८ तास भारनियमन गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. परिणामी विजेअभावी शहरातील उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहे. दररोज ९ ते ५ असे भारनियमन केले जाते. दिवसभर वीज खंडित झाल्याने शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कामकाजावरदेखील परिणाम झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या