गृहखात्याच्या अब्रूचे धिंडवडे निघाले; भिवंडीत तडीपारीच्या गुंडाचा चौकीत घुसून पोलिसावर हल्ला

31

सामना ऑनलाईन,ठाणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याच्या अब्रूचे अक्षरश: धिंडवडे निघत असून पोलिसांवर रोजच हल्ले सुरू आहेत. संवेदनशील भिवंडीत तर गुंडगिरीचा कहर झाला असून सागर भोईर या तडीपारीच्या गुंडाने दारूच्या नशेत थेट चौकीत घुसून पोलिसावर हल्ला केला. एवढेच नव्हे तर या गुंडाने  पोलिसाला  लाथाबुक्क्यांनी बेदम  मारहाण करीत हॉकी स्टीकने पोलीस ठाण्यात तोडफोडही केली. एका महिन्यात  हल्ल्याच्या तीन घटना घडल्याने पोलीस दलातील कर्मचाऱ्यांमध्येच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बारा-बारा तास डय़ुटी करून आमच्यावर जीवघेणे हल्ले होणार असतील तर काम करणार तरी कसे, असा एकच संतप्त सवाल पोलिसांमधून विचारला जात आहे. दरम्यान नशेबाज हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.

भिवंडी शहरात मुजोर रिक्षाचालकाच्या हल्ल्यात महिन्याभरापूर्वी प्रभाकर गायकवाड या बसचालकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच भिवंडी एसटी स्टॅण्डच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभी करणाऱया शफीक शेख याला जाब विचारल्याने त्याने वाहतूक पोलीस रविकांत पाटील यांना बेदम मारहाण केली होती. या घटनेचे तीक्र संताप व्यक्त होत असतानाच गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नशेत असणारा सागर ऊर्फ गण्या भोईर या गुंडाने नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काल्हेर पोलीस चौकीत घुसून पोलीसनाईक किशोर थोरात यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. दिवे गावात राहणारा गण्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाई झाली होती. अटक केल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

वीस मिनिटे धिंगाणा

पोलीसनाईक किशोर थोरात यांच्यावर हल्ला करणाऱया सागर ऊर्फ गण्याने पूर्ण पोलीस चौकीच अक्षरशः डोक्यावर घेतली होती. लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर थोरात यांच्याजवळील हॉकी स्टीक घेत त्याने तोडफोडही केली. हा  धिंगाणा तब्बल वीस मिनिटे चालू होता. यावेळी पोलीस ठाण्यात दोन पोलीसच होते. थोरात यांचा सहकारी पोलिसाने मारहाण करणाऱ्या गण्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही जुमानले नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या