प्रवाशांचा हार्बर रेल्वेच्या नावाने शिमगा, वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत

सामना ऑनलाईन, मुंबई
होळी पेटण्याच्या आधीच हार्बर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाच्या नावाने बोंबा मारायला आणि शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली आहे. सकाळी सहाच्या सुमारास शिवडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने बराच काळ हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सकाळीच घरातून कामासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना यामुळे भयंकर मनस्ताप सहन करावा लागला. लोकल ट्रेनची वाहतूक बंद झाल्याने अनेक प्रवासी गाडीतच अडकून पडले होते, गाडीतून उतरून चालत जावं का गाडीतच बसून रहावं हा त्यांना प्रश्न पडला होता. गाड्या बंद पडल्याने प्लॅटफॉर्मवरची गर्दी मिनटा मिनिटाला वाढत होती. बेस्ट प्रशासनाने ज्यादा गाड्या सोडत या प्रवाशांना मदतीचा हात दिला.

ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम अजूनही सुरु असून ते केव्हापर्यंत पूर्ण होईल हे प्रशासनातर्फे सांगण्यात आलेले नाही. अंधेरी-वडाळा आणि वडाळा-पनवेल दरम्यानची सेवा सुरू करण्यात प्रशासनाला यश आलं आहे, मात्र मुंबईकडे जाणारी वाहतूक सकाळी दहा वाजेपर्यंत सुरु झाली नव्हती.

आपली प्रतिक्रिया द्या