लोकल प्रवेश देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे महिला वर्गाकडून जोरदार स्वागत, डोंबिवलीत तिकीट खिडक्यांवर झुंबड

महिला प्रवाशांना लोकलची दारे सात महिन्यांनंतर खुली झाल्याने त्याचे जोरदार स्वागत महिला प्रवाशांनी केले आहे. महिलांनी आपल्या पासावर एक्स्टेन्शनचा स्टॅम्प मारण्यासाठी तसेच नवीन रेल्वे पास काढण्यासाठी डोंबिवलीत तिकीट खिडक्यांवर मोठी गर्दी केली होती. आज पहिलाच दिवस असल्याने प्रत्यक्ष लोकलमध्ये मोठी गर्दी झाली नसली तरी महिलांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. महिलांनी केवळ महिला डब्यातच प्रवेश न करता सर्वच डब्यांत मुक्त संचार करीत आज प्रवासाचा मनसोक्त आनंद लुटला.

22 मार्च रोजी रेल्वे बंद झाल्यानंतर 15 जूनपासून लोकलचा प्रवास सुरू झाला असला तरी तो अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांपुरता मर्यादित होता. अत्यावश्यक कर्मचाऱयांसाठी मध्य रेल्वेवर 706 तर पश्चिम रेल्वेवर 704 फेऱया चालविण्यात येत आहेत. त्यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर सर्वच महिलांना लोकलमध्ये प्रवेश देण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. त्यावर आडेवेढे घेत अखेर बुधवारपासून रेल्वेने सर्व महिलांसाठी लोकलचा प्रवास खुला केला आहे. स. 11 ते दु. 3 आणि पुन्हा सायं. 7 ते रात्री शेवटच्या लोकलपर्यंत महिलांना कोणताही ‘क्यूआर’ कोडशिवाय केवळ वैध तिकीट वा पासावर प्रवास करता येत आहे. आज पहिलाच दिवस असल्याने सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत फारशा महिलांनी प्रवास केला नसल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

– शिळफाटय़ाच्या वाहतूककोंडीतून सुटका
लोकलची दारे इतके महिने सर्वसामान्य प्रवाशांना बंद आहेत. आता सर्व महिलांना लोकलमध्ये प्रवास करता येत असल्याने ठाण्यापलीकडील दिवा, डोंबिवली, कल्याण येथे राहणाऱया तसेच खासगी नोकरी करणाऱया महिला प्रवाशांचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे एवढे दिवस रस्त्यावरील शिळफाटासारख्या ठिकाणी वाहतूककोंडीत अडपून पडण्याच्या त्रासातून महिला वर्गाची सुटका झाल्याने त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत. सरकारने स. 11 वाजताची वेळ थोडी आणखीन मागे घ्यावी तसेच खासगी कार्यालयांनीही कामाची वेळ बदलून महिलांसाठी कामाचे तास थोडे कमी करण्याचे आदेश कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावेत अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाच्या लता अरगडे यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या