मोटरमनने लोकल मालाड स्थानकाऐवजी थेट यार्डात नेली

सामना ऑनलाईन, मुंबई

पश्चिम रेल्वेच्या हजारो प्रवाशांना सोमवारी विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले. मालाड स्थानक येण्याची नेहमीप्रमाणे वाट पाहणाऱ्या प्रवाशांची लोकल थेट कांदिवली यार्डात शिरल्याने प्रवासी भांबावले. मोटरमनच्या चुकीमुळे प्रवाशांना मग तंगडतोड करीत कांदिवली स्थानक गाठून पुढचा प्रवास करावा लागला.

चर्चगेटवरून सुटलेली लोकल मालाडच्या दिशेने निघाली खरी; परंतु सकाळी ११.४३ वाजता गोरेगाव स्थानक गेल्यानंतर प्रवासी मालाड स्थानक येणार म्हणून उतरण्याच्या तयारीत असताना, अचानक लोकलने वेगळाच ट्रॅक पकडला. मोटरमनने ही लोकल मालाड स्थानकात न थांबवता थेट कांदिवली यार्डात नेऊन थांबविली. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गेंधळ उडाला. प्रवाशांनी मोटरमनच्या नावाने शिमगा करीत गेंधळ घातला. अखेर आरपीएफच्या जवानांना पाचारण करावे लागले. त्यानंतर प्रवाशांना कांदिवली स्थानकापर्यंत भर उन्हात पायपीट करावी लागली. मोटरमनच्या चुकीमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.