जून महिन्यात विजेचे बिल 10 पट जास्त, व्यावसायिकाची हायकोर्टात याचिका

mumbai bombay-highcourt

लॉकडाऊनमुळे अनेक वीज कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना जून महिन्याची वाढीव बिले पाठवून ‘शॉक’ दिला आहे. अशातच मुलुंडमधील एका व्यवसायिकाला सरासरी बिलाच्या तब्बल 10 पट जास्त बिल कंपनीने पाठवले आहे. या विरोधात व्यवसायिकाने हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली असून यातून सूट देण्याची मागणी केली आहे.

मार्च ते मे या कालावधीत अनेक ग्राहकांना वीज कंपन्यांनी फुगलेली वीज बिले पाठवल्याच्या तक्रारी उघडकीस आल्या आहेत. मुलुंड मधील व्यावसायिक रवींद्र देसाई यांना कंपनीने सरासरी बिलाच्या 10 पट जास्त बिल पाठवले आहे. या प्रकरणी ऍड्. विशाल सक्सेना यांच्या वतीने देसाई यांनी हायकोर्टात एमएसईडीसीएल, अदानी आणि टाटा पॉवर यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने जूनच्या वीज बिलात सूट द्यावी, पैसे टप्प्या टप्प्याने भरण्याची मुदत द्यावी तसेच कोरोना संकटाच्या काळात भविष्यात अतिरिक्त वीज बिल कंपन्यांनी आकारू नये म्हणून राज्य सरकारने धोरण आखावे अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या