लॉकडाऊनमध्ये अडकलेले प्रवासी बसमधून गावी निघाले; सिंधुदुर्ग, रायगडला 66 प्रवासी रवाना

748

लॉकडाऊनमध्ये जिल्हयात अडकलेल्या नागरिकांनी त्यांच्यागावी सोडण्यासाठी आजपासून रत्नागिरीतून एसटी बस सोडण्यात आल्या. एका सीटवर एक अशाप्रकारे सोशल डिस्टन्सिंग पाळून प्रवाशांना बसमधून पाठविण्यात आले. तीन गाड्यातून 66 प्रवासी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रवाना झाले.

लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरीत अडकून पडलेल्या व्यक्तींनी विनंती अर्जानुसार मंजुरी प्राप्त झालेल्यांना राज्यातील इतर जिल्ह्यात पाठविण्यात येत आहे. आज रत्नागिरी रहाटाघर बसस्थानकातून रायगड- अलिबाग आणि सिंधुदुर्ग- ओरसला बस सोडण्यात आली. त्यापूर्वी प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर चिपळूण बसस्थानकातून एक गाडी सोडण्यात आली. दापोली आणि लांजा बसस्थानकातून गाड्या सुटल्या नाहीत.

जिल्हातील विविध बसस्थानकांमधून सिंधुदूर्ग, रायगड (अलिबाग), बुलढाणा, लातूर, भंडारा, सातारा, गोंदिया आणि अमरावती या 8 जिल्हयांना जाणाऱ्या बसेस सुटतील. उद्या जिल्ह्यातील विविध बसस्थानकातून सोळा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यानंतर 10 मे रोजी तीन गाड्या सुटणार आहेत.

एका गाडीत 22 प्रवासी
बसस्थानकावर प्रवाशांना दोन तास आधी बोलावण्यात आले होते. बसस्थानकात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.त्यानंतर सोशल डिस्टन्सिंग पाळत एका सीटवर एक अशा एका बसमधून 22 प्रवासी बसविण्यात आले. आज सुटलेल्या तीन गाड्यामधून 66 प्रवाशांनी प्रवास केला.

आपली प्रतिक्रिया द्या