लॉकडाऊनच्या काळात बचत गटातील महिलांनी केली 40 लाखांच्या कोंबड्यांची विक्री

491

कोरोनाच्या हाहाकारात अनेक व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. मात्र संकटातुन संधी ही म्हण सार्थकी ठरवत उमेद अभियानांतर्गत स्थापन केलेल्या संगमेश्वर तालुक्यातील सुमारे 500 बचत गटातील सुमारे 2600 महिलांनी लॉकडाऊनच्या काळात कोंबड्याच्या विक्रीतून तब्बल 40 लाखापेक्षा अधिक कमाई केली. राज्यात चिकनचे दर घसरल्यामुळे अनेक ठिकाणी कोंबड्या फुकट वाटल्या गेल्या असताना रत्नागिरीत उलट चित्र पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) ची सुरुवात संगमेश्वर तालुक्यामध्ये 2012-13ला झाली. दुर्गम व डोंगराळ भागातील महिला एकत्र आल्या. सुमारे 2200 गटांची स्थापना करण्यात यश आले. शाश्वत उपजीविकेसाठी भात लागवड करणे, पारंपरिक व्यवसायाना चालना देणे, झेंडू लागवड आदी व्यवसायापासून सुरुवात झाली. यातून दरमहा उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे परसातील कुक्कुट पालनाला सुरुवात केली. त्यानुसार गटातील महिलांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले.

कोरोना आला आणि बॉयलर कोंबड्यांचे अर्थात चिकनचे दर पडले. कोंबड्या फुकट देखील वाटण्याची वेळ व्यवसायिकांवर आली होती. हे चित्र रत्नागिरीतही कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळत होते. चिकनचे दर घसरले आणि पोल्ट्री व्यवसायाला घरघर लागली. याच संकटाच्या काळात कोकणातील गावागावात उभारलेल्या बचत गटाच्या चळवळीतील महिलांनी हजारो गावठी कोंबड्या विकून लाखोंची कमाई केली.

कोरोना आणि लॉक डाऊनच्या काळात चिकनबद्दल अनेक गैरसमज होते. परिणामी लोकांनी गावठी कोंबड्यांकडे आपला मोर्चा मिळवला. याचा परिणाम असा झाला की कोंबड्यादेखील मिळेनासे झाल्या आहेत. तसेच लॉक डाऊनमुळे गावातून बाहेर जाणे शक्य नाही. मासळी किंवा अन्य मत्स्य पदार्थ मिळणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे दोन पैसे जास्त मोजून ग्राहक कोंबड्या खरेदीसाठी तयार आहेत. त्याचा फायदा या व्यवसायिकांना मिळाला. कोकणातल्या ग्रामीण भागात लोक अनेक किलोमीटरचं अंतर कापत घरी येऊ लागले आणि कोंबड्या विकत घेऊ लागले. शिवाय, अंड्यांना देखील चांगला भाव मिळू लागला आहे.

संगमेश्वर तालुक्यात 7 प्रभाग आहेत. 2019-20 या वर्षात सदस्यांनी एक दिवसांची 16939 पिल्ले तर 1 महिन्याची 16227 पिल्ले खरेदी करण्यात आली. ती गिरीराज, वनराज व गावठी या जातीची आहेत. ती या वातावरणात चांगली तयार होतात. तसेच त्यांना मागणीही चांगली असते. 33166 पिल्लांपैकी मार्च अखेर 24410 कोंबडयांची सरासरी 350 रुपये या दराने विक्री करण्यात आली. यापासून सुमारे 61 लाख 2 हजार पाचशे इतकी उलाढाल झालेली असून खर्च वजा जाता सुमारे 40 लाख रुपये इतका निव्वळ नफा मिळालेला आहे. यातील बरीचशी लॉकडाउनच्या काळात झाली. सुरुवातीच्या काळात ज्यावेळी चिकन-मटन दुकाने बंद होती, त्यावेळी गावातल्या गावात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. लॉकडाउन काळात उत्पन्नाचे महत्वाचे साधन म्हणून याकडे पाहिले गेले व गरीब कुटुंबांना आधार मिळाला. लॉकडाउन काळात सुमारे 20 ते 25 लाख रुपयांची विक्री झाली असून ती अजूनही सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या