नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाहीचा बडगा, बुलढाण्यात पालिकेने वसूल केला 43 हजारांचा दंड

लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक नागरिकांवर दंडात्मक कार्यवाहीचा बडगा उगारत बुलढाणा पालिकेने 43 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नगर परिषद बुलढाणाचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली काल शहरातील प्रमुख चौकांसह शहरास जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने शहरातील व शहरालगतच्या विविध भागातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात आली. मास्क न लावणे, वाहन चालवताना ठरवून दिलेल्या नियमानुसार नसणे, दुकानदारांनी दरपत्रक न लावणे, सोशल डीस्टन्स न पाळणे, भाजीपाला विक्रेत्यांनी नियम तोडणे अश्या विविध कारणांनी नियमांचे उल्लंघन करणे इत्यादी कारणांमुळे दंडात्मक कार्यवाहीचा बडगा उचलला आहे. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून विविध प्रयत्न करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे इतरांचे आरोग्य धोक्यात येत असेल तर आपणास दंडात्मक कार्यवाही करणेच उचित ठरेल. जेणेकरून नागरिक नियमांचे उल्लंघन करणार नाहीत व आरोग्यविषयक बाबतीत खबरदारी घेतील असे मुख्याधिकारी महेश वाघमोडे म्हणाले.

8 व 9 जुलै रोजी शहरातील विविध भागातून न.प. च्या विविध पथकातील श्रीकांत पवार, राजेश भालेराव, सुधीर दलाल, शुभम जाधव, संजय अहिर , राजेंद्र मुन्हेकर , प्रसेनजीत इंगळे भेंडखळे, मेश्राम इत्यादींनी 43 हजार 400 रुपये वसूल केला आहे. तरी नागरिकांनी नियमाचे पालन करून कोरोना साथ रोग नियंत्रणात आणण्याकरिता शासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी वाघमोडे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या