बडतर्फ पदाधिकाऱ्यांची पुन्हा क्रिकेट प्रशासनात लुडबूड नको!

18

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने यंदा २ जानेवारीला हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ज्या पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरवले अथवा पदावरून बडतर्फ केले त्यांनी कोणत्याही स्थितीत देशातील क्रिकेट संघटनांच्या कारभारात पुन्हा लुडबूड करू नये अशी समज न्यायमूर्ती लोढा समितीने एका स्पष्टीकरणाद्वारे दिली आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) बीसीसीआयचे माजी सचिव व एमसीएचे माजी अध्यक्ष अजय शिर्के यांची बीसीसीआय बैठकीसाठी आपला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली. त्या अनुषंगाने लोढा समितीने ताजे स्पष्टीकरण प्रसूत केले आहे.

लोढा समितीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर सर्वांनीच राखायला हवाय. त्यामुळे बडतर्फ अथवा आसाम क्रिकेट प्रशासकांना क्रिकेट प्रशासनात सध्या कोणतीही जबाबदारी पार पाडता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. असा पदाधिकारी क्रिकेट संघटनेचा सल्लागार अथवा आश्रयदाता म्हणूनही काम करू शकणार नाही. राज्य क्रिकेट संघटनांच्या नव्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या १९ जानेवारीच्या सुनावणीपर्यंत थांबावे असही लोढा समितीने सूचित केलेय.

इंग्लंडविरुद्धची मालिका सुरळीत पार पडावी हीच इच्छा – अजय शिर्के

बीसीसीआय अथवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पदासाठी मला अपात्र ठरविण्यात आले असले तरी क्रिकेटच्या भल्यासाठी मी काम करीतच राहणार आहे. इंग्लंड व हिंदुस्थान यांच्यातील मायदेशातील वनडे व टी-२० क्रिकेट मालिका सुरळीत पार पडावी एवढीच इच्छा आहे. असे सांगून माजी बीसीसीआय सचिव अजय शिर्के म्हणाले, काही लोक माझ्या बदनामीच्या हेतूने अनेक अफवा पसरवत आहेत. त्या अफवांकडे लक्ष न देता मी क्रिकेटच्या हितासाठी झटत राहणार आहे. पुण्यातील इंग्लंड-हिंदुस्थान पहिला ‘वन डे’ सामना सुरळीत पार पडेल असा मला विश्वास आहे.

‘कुलिंग ऑफ’चा नियम गांगुलीलाही भोवणार

टीम इंडियाचा माजी कर्णधार व ‘क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल’चा अध्यक्ष सौरभ गांगुलीलाही लोढा समितीचा तीन वर्षे कुलिंग ऑफ नियम जाचक ठरणार असल्याचे संकेत आहेत. कारण गांगुलीने कॅबच्या अध्यक्षपदाची दोन वर्षे आणि त्याआधी सचिवपदाचा कालावधी असा तीन वर्षांहून अधिक कार्यकाळ पूर्ण केल्याने गांगुलीही बीसीसीआय पदाधिकारी अथवा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी अपात्र ठरू शकतो. त्याशिवाय कॅबचे सध्याचे सहसचिव बिस्वरूप डे यांनी या पदावर दोन वर्षे आणि त्याआधी कोषाध्यक्ष म्हणून आठ वर्षे काढल्याने त्यांचा दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे डे हेसुद्धा आता पदाधिकारीपदासाठी अपात्र ठरणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या