Lok sabha 2019 : महाराष्ट्रात पावणेनऊ कोटी मतदार

कृष्णादास वैश्नव : मध्य प्रदेशमधील कृष्णादास यांना सर्वात वृत्त मतदारांच्या यादीत समावेश होतो. 105 वर्षीय कृष्णादास स्वातंत्र्यानंतर प्रत्येक लोकसभेमध्ये मतदान करत आले आहेत.

सामना ऑनलाईन  । मुंबई

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या 48  मतदारसंघांतील सुमारे पावणेनऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे जिल्हा ठरणार आहे, तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.

 रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून 14  लाख 40 हजार एकूण मतदारांमध्ये 7 लाख 35  हजार 597 एवढी महिला मतदारांची संख्या आहे. ठाणे मतदारसंघात राज्यात सर्वाधिक सुमारे  23 लाखांहून अधिक मतदारांची संख्या असून 12 लाख 60 हजारांहून अधिक पुरुष मतदारांची संख्या आहे.

नागपूर, शिरूर, पुणे, बारामतीत 20 लाखांहून अधिक मतदार

मावळ मतदारसंघात 22  लाखांहून अधिक, शिरूर 21  लाखांहून अधिक, नागपूर 21  लाखांहून अधिक, पुणे आणि बारामतीमध्ये प्रत्येकी 20 लाखांहून अधिक मतदार आहेत. मुंबईतील मुंबई-उत्तर मतदारसंघात 16 लाखांहून अधिक मतदार असून मुंबई उत्तर-दक्षिण मतदारसंघात 16 लाख 98 हजार मतदार आहेत, तर मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघात 15 लाख 58 हजार मतदार आहेत. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात 16 लाख 48 हजार, मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात  14 लाख 15 हजार मतदार आहेत.

 मतदानासाठी सहा लाख कर्मचारी

राज्यात  11,  18,  23 व 29  एप्रिल या चार टप्प्यांत होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज होत आहे. राज्यात 4 कोटी 57 लाखांहून अधिक पुरुष मतदार असून 4 कोटी 16 लाखांहून अधिक महिला मतदार आहेत.

नऊ मतदारसंघ राखीव

नंदुरबार, गडचिरोली-चिमूर, दिंडोरी, पालघर हे चार मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असून अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर हे पाच मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.

मतदारसंघनिहाय एकूण मतदारांची संख्या

नंदुरबार 18  लाख 50  हजार, धुळे 18 लाख 74 हजार, जळगाव 19  लाख  10  हजार, रावेर 17  लाख  60  हजार, बुलढाणा 17 लाख 46 हजार, अकोला 18 लाख 54  हजार, अमरावती 18 लाख 12 हजार, वर्धा 17 लाख 23 हजार, रामटेक 18 लाख 97 हजार, भंडारा-गोंदिया 17 लाख 91 हजार, गडचिरोली-चिमूर 15 लाख 68 हजार, चंद्रपूर 18 लाख 90 हजार, यवतमाळ-वाशीम 18 लाख 90 हजार, हिंगोली 17 लाख 16 हजार, नांदेड 17 लाख, परभणी 19 लाख 70 हजार, जालना 18 लाख 43 हजार, संभाजीनगर 18 लाख 57 हजार, दिंडोरी 17 लाख, नाशिक 18 लाख 51 हजार, पालघर 18 लाख 13 हजार, भिवंडी 18 लाख 58 हजार, कल्याण 19 लाख 27 हजार, रायगड 16 लाख 37 हजार, नगर 18 लाख 31 हजार, शिर्डी 16 लाख 61 हजार, बीड 20 लाख 28 हजार, धाराशीव 18 लाख 71  हजार, लातूर 18 लाख 60 हजार, सोलापूर 18 लाख 20 हजार, माढा 18 लाख 86 हजार, सांगली 17 लाख 92 हजार, सातारा 18 लाख 23 हजार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 14 लाख 40  हजार, कोल्हापूर 18 लाख 68 हजार आणि हातकणंगले 17 लाख 65 हजार.