Lok sabha 2019 नगरमध्ये राष्ट्रवादीकडून आणखी एक नाव चर्चेत

1374
ncp logo

सामना प्रतिनिधी । नगर

मुंबई येथे बुधवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांचे स्वतंत्र म्हणणे ऐकून घेतले आहे. लोकसभेसाठी इच्छुकांमध्ये आमदार अरुण जगताप यांच्या पाठोपाठ आमदार संग्राम जगताप यांचे नाव देखील आता चर्चेत आले आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीकडे असल्यामुळे राष्ट्रवादीने उमेदवारांची चाचपणी सुरू केलेली आहे. विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अंतर्गत खलबते सुरू झालेली आहेत. मुंबई येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नगरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीला मधुकरराव पिचड, आमदार अरुण जगताप, प्रताप ढाकणे, सर्जेराव निमसे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार संग्राम जगताप, दादाभाऊ कळमकर, शिवाजी गाडे, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

काल झालेल्या बैठकीनंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना स्वतंत्ररीत्या बोलून त्यांची मते जाणून घेतली. निवडणुकीकरता कोण उमेदवार योग्य राहील याबाबत चाचपणी सुद्धा त्यांनी केल्याचे बोलले जाते. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नावावर सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे. त्यांनी ही निवडणूक लढवावी असे मत सुद्धा यावेळी मांडण्यात आलेले आहे. या अगोदर आमदार अरुण जगताप यांचे नाव आघाडीवर होते. काल प्रशांत गडाख यांनी उमेदवारीसाठी अर्ज न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता राष्ट्रवादीपुढे उमेदवारी संदर्भांमध्ये संग्राम जगताप यांचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे आता नेमका उमेदवार कोण निश्चित होणार याकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान या संदर्भामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काल बैठक झाल्याचे सांगितले. पण दुसरीकडे अद्याप कोणाची उमेदवारी निश्चित केलेली नाही. येत्या एक-दोन दिवसांमध्ये उमेदवारी निश्चित होईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या