Lok sabha 2019 अन्य पक्षांतील बडे नेते भाजपमध्ये येतील – मुख्यमंत्र्यांचे संकेत

सामना ऑनलाईन  । मुंबई

राष्ट्रवादीचे माढय़ातील लोकसभा उमेदवारीचे प्रबळ दावेदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगे आगे देखिये होता है क्या, असे सांगत येत्या एक-दोन दिवसांत अन्य पक्षांतील बडे नेते भाजपमध्ये येणार असल्याचे संकेत दिले. त्याचबरोबर भाजप उमेदवारांची यादीही एक-दोन दिवसांत जाहीर होईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भाजपच्या नरीमन पॉइंट येथील ‘मीडिया सेंटर’चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, माधव भांडारी, केशव उपाध्ये आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात ‘रालोआ’च प्रथम क्रमांकावर आहे. आता दुसऱ्या क्रमांकावर कोण यासाठीच काँग्रेस, सपा, बसपा आदींची लढाई होणार आहे. 2014 पेक्षा मोदीलाट मोठय़ा प्रमाणाकर यंदा आहे हे राज्यात जाणवते आहे. राज्यात शिवसेना-भाजप महायुती रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सुजय विखे-पाटील यांच्यानंतर त्यांचे वडील राधाकृष्ण विखे- पाटीलदेखील भाजपमध्ये येणार काय, असा प्रश्न विचारला असता त्याचे थेट उत्तर न देता इतर पक्षांतील अनेक प्रमुख नेते भाजपमध्ये येणार आहेत. आगे आगे देखिये होता है क्या असे उत्तर त्यांनी दिले.

पवार ‘मॅच्युअर्ड’, पण त्यांचे नेते ‘इमॅच्युअर्ड’

शरद पवार यांनी एअर स्ट्राइककरून केलेल्या वक्तव्याकर सध्या वाद निर्माण झाला आहे. त्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, शरद पवार यांनी पहिले काय वक्तव्य केले ते मी ऐकले नाही, मात्र नंतर त्यांनीच स्वतः आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. पण त्यांच्याकडे सध्या असंमजसपणाची स्थिती आहे. एअर स्ट्राइकचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळू नये यासाठी कदाचित असे होत असावे. पण शरद पवार हे ‘मॅच्युअर्ड’ नेते आहेत, पण त्यांच्या पक्षात अनेक ‘इमॅच्युअर्ड’ नेते आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.

आठवलेंना लोकसभेचे तिकीट नाही

यंदाच्या लोकसभा निवडणूकीत रामदास आठवले यांच्या रिपाइंला पक्षाला उमेदवारी देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा योग्य मान राखला जाईल, असे स्पष्ट करतानाच यासंदर्भात आठवलेंशी आपली चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले. 24 मार्च रोजी युतीची सभा होणार असून या सभेमध्ये ते उपस्थित राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.