दक्षिण मुंबईत आदित्य ठाकरे यांच्या रोड शोला तुफान प्रतिसाद

aaditya-thackeray-cricket

सामना प्रतिनिधी । मुंबई

lok sabha election 2019 शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा रोड शो आज दक्षिण मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या रोड शोला तुफान प्रतिसाद लाभला. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या या रोड शोमध्ये विभागातील असंख्य शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले होते. शेकडो तरुण बाईकवरून सहभागी झाले होते.

परळ येथील गौरीशंकर मिठाईवालासमोरील चौकातून या रोड शोला सुरुवात झाली. यावेळी ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘महायुती झिंदाबाद’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला. तिथून आचार्य दोंदे मार्गावरून शिवडी नाकामार्गे झकेरीया बंदर करत अभ्युदय नगरात ही रॅली पोहोचली. ठिकठिकाणी नागरिकांनी दुतर्फा उभे राहून या रोड शोचे स्वागत केले. आदित्य ठाकरे यांच्यासोबत यावेळी शिवसेना चित्रपट सेनेचे पदाधिकारी अभिनेते सुशांत शेलार, आमदार अजय चौधरी, माजी खासदार मोहन रावले, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण आदी सहभागी झाले होते.

अभ्युदय नगर येथून ही रॅली चिंचपोकळी, लालबाग येथे येताच प्रचंड जल्लोषात तिचे स्वागत झाले. साने गुरुजी मार्ग, भारतमाता, गणेश गल्ली येथे रोड शोचे स्वागत करण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. त्यानंतर डॉ. एस. एस. रावमार्गे एम. डी. कॉलेज, शिरोडकर हायस्कूल मार्गावरून ही रॅली केईएम रुग्णालयासमोरील बाबू गेनू पुतळय़ाजवळ पोहोचली. तिथे रोड शोची सांगता झाली. यावेळी बाजूच्याच कामगार मैदानावर क्रिकेट खेळणाऱया तरुणांमध्ये सहभागी होत आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याबरोबर क्रिकेटचा आनंद घेतला.

कोणत्याही उमेदवाराला आम्ही कमी लेखत नाही

या रोड शोदरम्यान पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आपले कार्यक्रम होत असून तरुणांशी प्रत्यक्ष संवादही साधत आहोत. महायुतीला मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. कोणत्याही उमेदवाराला आम्ही कमी लेखत नाही. ही निवडणूक आहे. यामध्ये मतदारांचा कौल महत्त्वाचा आहे आणि तो महायुतीच्या बाजूने जास्तीत जास्त मिळावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.