पश्चिम बंगाल आम्हाला 300 चा टप्पा पार करून देणार, मोदींचा ठाम विश्वास

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पश्चिम बंगाल हे देशाच्या राजकरणाचा केंद्रबिंदू बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याप्रकरणी मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर निशाणा साधला. बाहेरील देशातून येणारे घुसखोर टीएमसीवाल्यांना दिसत नाहीत. मात्र, देशाच्या राष्ट्रगीताचा सन्मान करणारे त्यांना घुसखोर वाटतात असा टोला मोदींनी यावेळी लगावला. ते एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

विरोधीपक्ष निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहे. खोटा प्रचार करून मला शिव्या देण्याच्या काम विरोधी पक्षातील नेते करत असल्याचा आरोप मोदींनी केला. बाहेरून येऊन देशात घुसखोरी करणारे ममता बॅनर्जी यांना कधीच दिसले नाहीत. मग राष्ट्रगीत व वंदेमातरम् बोलणारे त्यांना घुसखोर कसे वाटतात, असा सवाल मोदींनी केला.

ममता निवडणूक आयोगावर दबाव आणत आहेत
पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेपेक्षा तिथे झालेल्या हिंसाचाराचीच जास्त चर्चा आहे. आधीच्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्यावेळी सुद्धा हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या, याची आठवण मोदी यांनी यावेळी करून दिली. ममता बॅनर्जी या निवडणूक आयोगावर दबाव आणत आहेत. पण आता बंगाली जनता दीदींच्या दादागिरीविरोधात उभी ठाकली आहे. त्यामुळे ममतांचे नाटकी वर्तन त्यांचा पराभव टाळू शकणार नाही, असाही विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

तसेच आताच्या निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांना पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातच बहुमत मिळाले आहे. पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या मतदानामुळे आम्ही 300 चा आकडा पार करू, असा ठाम विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.