मिंध्यांची गुलामी करणाऱ्या अधिकाऱ्यांना ही चोरी पचणार नाही, संजय राऊत यांचा इशारा

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला. त्या ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी अमोल कीर्तिकरांबाबत मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली निर्णय दिला. मिध्यांची गुलामी करणाऱया अधिकाऱयांना ही चोरी पचणार नाही, असा इशारा शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना संशयास्पदरीत्या विजयी घोषित करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अमोल कीर्तिकर यांनी केली आहे. आठवडाभरापासून मतमोजणीच्या वेळीचे सीसीटीव्ही फुटेज मागितले जात आहे, परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱयाकडून फुटेज दिले जात नाही, याबाबत पत्रकारांनी आज शिवसेना नेते संजय राऊतांना प्रश्न केला असता ते म्हणाले, ‘‘जो चोर असतो तो सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा नष्ट करतो. हा सर्व प्रकार वंदना सूर्यवंशीने केला आहे. मी लवकरच त्यांना एक्स्पोज करणार आहे,’’ असा इशाराही त्यांनी दिला.

रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी या महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्टाचारी अधिकारी आहेत. त्यांचा इतिहास पाहा. सर्वात भ्रष्टाचारी अधिकारी जर कोणी असतील तर वंदना सूर्यवंशी आहेत. त्यांनीच अमोल कीर्तिकरांचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली दिला आहे. याप्रकरणी आम्ही कोर्टात जाणार आहोत. या ठिकाणी कीर्तिकर विजयी होतील. मुख्यमंत्री शिंदे यांची गुलामी करणारे निवडणूक अधिकारी, पोलीस अधिकारी यांना हा निकाल पचणार नाही, ही चोरी पचणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांनी कशा चोऱयामाऱया केल्या हे उघड करणार

रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशींचा प्रशासकीय इतिहास वादग्रस्त आहे. कोणाच्या दबावाखाली काय काम केलंय… कशा चोऱयामाऱया एमएमआरडीएपासून महसूल विभागापर्यंत केल्या हे लवकरच उघड करणार. सीसीटीव्ही फुटेज मिळत नाहीत ही त्यांची जबाबदारी आहे. रवींद्र वायकरांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार मोबाईल घेऊन फिरत होते, त्यांनी का रोखलं नाही? त्या आपल्या कर्तव्याला जागलेल्या नाहीत, असा सवाल संजय राऊत यांनी केला.