Lok sabha election result 2024 : सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणाऱ्या उमेदवारांची यादी, INDIA की NDA कुणी मारली बाजी?

 

लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागला. 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला 300 पार करतानाही नाकीनऊ आले. NDA ची गाडी 292 वर अडकली, तर INDIA आघाडीने 232 जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला, तर काही काठावर पास झाले. काहींनी मात्र विक्रमी मतांनी विजय मिळवला.

भाजप आणि काँग्रेसच्या अनेक उमदेवार लाखोंचे मताधिक्य घेऊन विजयी झाले. यंदाच्या निवडणुकीत सर्वात मोठा विजय भाजपचे खासदार शंकर लालवानी यांनी नोंदवला. इंदूर लोकसभा मतदरसंघात त्यांनी 11 लाख 72 हजार मतांनी विजयश्री खेचून आणली.

आसामच्या धुबरी येथून काँग्रेसचे रकिबुल हुसैन 10 लाख 12 हजार मताच्या फरकाने विजयी झाले. तिसऱ्या स्थानावर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान असून त्यांनी 8 लाख 21 हजार मतांनी विजय मिळवला.

गुजरातच्या नवसारी येथून भाजपचे सीआर पाटील 7 लाख 73 हजार मतांनी विजयी झाले. सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्या उमेदवारात ते चौथ्या स्थानावर राहिले. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांधीनगर मतदासंघातून 7 लाख 44 हजार एवढ्या मतांच्या फरकाने विजय मिळवला.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी 5 लाख 40 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. तसेच राजपालसिंह जादव यांनी पंचमहल, हेमंत जोशी यांनी वडोदरा, आलोक शर्मा यांनी भोपाळ आणि सुधीर गुप्ता यांनी मंदसौर येथून 5 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला.