कांदा, सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या संतापाचा भाजपला फटका

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामागे कांदा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱयांचे प्रश्नही जबाबदार आहेत. भाजपा आणि राज्यातील महायुती सरकारने या शेतकऱयांच्या मद्दय़ांकडे गांभीर्याने लक्षच दिले नाही. परिणामी ही पीके ज्या भागात घेतली जातात त्या भागात भाजप उमेदवारांना फटका बसला.

विदर्भ, मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघात ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कापूस, सोयाबीन अशा पिकांवर अवलंबून आहे. मागील तीन वर्षांत कापूस, सोयाबीनसह इतर नगदी पिकांच्या बाजारभावात मोठी घट झाली. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

कांदा निर्यात बंदीमुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. गुजरात आणि कर्नाटकातील कांदा निर्यात बंदी नरेंद्र मोदी सरकारने उठवली. परंतु महाराष्ट्रात निर्यातबंदी कायम ठेवल्याने शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे कांदा उत्पादक भाजपवर नाराज होता.

कापूस आणि सोयाबीनलाही महायुती सरकारकडून योग्य भाव मिळत नसल्याने विदर्भातील शेतकऱयांमध्ये सरकारबद्दल असंतोष होता. त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटले. विदर्भात भाजपऐवजी काँग्रेसला अधिक पसंती मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱयांचे मूळप्रश्न सोडवण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाही. निवडणूक प्रचारातही मोदींनी या शेतकऱयांच्या विषयावर काहीच भाष्य केले नव्हते. दुसरीकडे काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये हमीभाव हा घटनात्मक अधिकार देऊ, असे सांगितले व शेतकरी, आदिवासी, बेरोजगार, महिला, आरोग्य आदी घटकांबाबत सकारात्मक आश्वासन दिले. त्यामुळे काँग्रेसबद्दल शेतकऱयांच्या मनात चांगली भावना निर्माण झाली आहे.

नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नगर, पुणे, सोलापूर हे कांदा उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. या जिह्यांमध्ये भाजप उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. दिंडोरीमध्ये राष्ट्रवादीच्या भास्कर भगरे यांनी केंद्रीय मंत्री व भाजपा उमेदवार डॉ. भारती पवार यांचा पराभव केला. नगरमध्ये भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱयांनी महायुतीवरील रागापोटी शिवसेना उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या बाजूने कौल दिला. नंदुरबारमध्ये खासदार हिना गावित यांचा काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी पराभव केला. सोलापूर आणि पुण्याच्या शिरूरमध्येही भाजपचे पानिपत झाले.