नगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रशासकिय तयारी पूर्ण

185
voting

सामना प्रतिनिधी । नगर

नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी 23 मे रोजी होणार असून याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. यासाठी सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. सकाळी आठ पासून मोजणीस प्रारंभ होणार असून दुपारपर्यंत ईव्हीएमची मतमोजणी पूर्ण होऊन चित्र स्पष्ट होईल, मात्र त्यानंतर काही व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या व टपाली मतदान मोजण्यास वेळ लागणार असल्याने अधिकृत निकाल सायंकाळी सात वाजेपर्यंत जाहीर होऊ शकतो.

जिल्हा प्रशासनाने नगर व शिर्डी अशा दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. एमआयडीसीतील राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी होणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज झाला असून दोन टप्प्यात या कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यातील पहिले प्रशिक्षण झाले आहे. त्यानंतर 22 मे रोजी मतमोजणीची रंगीत तालीमच गोडाऊनमध्ये होणार आहे. नगर मतदारसंघात 2030 मतदान केंद्रावर 64.36 टक्के, तर शिर्डीत 1710 मतदान केंद्रावर 64.54 टक्के मतदान झालेले आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एका कक्षाची उभारणी करण्यात आली असून, त्यात प्रत्येकी 14 टेबल असतील. त्यानुसार साधारण 22 ते 25 फेऱ्यांत मोजणी होणार आहे. एका फेरीसाठी 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागणार असून, प्रत्येक फेरीनिहाय उमेदवारांना पडलेली मते जाहीर होतील. साधारण दुपारी एक वाजेपर्यंत फेऱ्या संपून निकालाचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर टपाली व काही व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजणीस वेळ लागणार असल्याने सायंकाळी सातपर्यंत अंतिम निकाल हाती येऊ शकतो.

जिल्ह्यात 60 व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजणार
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या जाणार आहेत. जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ असल्याने 60 व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजल्या जातील. याशिवाय नगर मतदारसंघातून 13 हजार 178 टपाली व 7 हजार 148 ईटीपीबीएस (ऑनलाईन मतपत्रिका) मतपत्रिका पाठविल्या होत्या. त्यातील 4 हजार 979 टपाली, तर 3 हजार 794 ईटीपीबीएस मतपत्रिका प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. शिर्डी मतदारसंघातूनही 8 हजार 870 टपाली व 2 हजार 776 ईटीपीबीएस मतपत्रिका पाठवल्या आहेत. या मतपत्रिका व व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजणीसाठी मोठा कालावधी लागू शकतो. परिणामी निकाल लांबणार आहे.

प्रत्येक मतदारसंघासाठी मतमोजणी स्टाफ
मतमोजणी कक्ष -6 , मतमोजणी टेबल -84, टपाली मोजणी टेबल – 1, मतमोजणी पर्यवेक्षक – 84, मतमोजणी सहायक – 84, सूक्ष्म निरीक्षक – 84, आकडेवारी एकत्रिकरण स्टाफ – 12, रो ऑफिसर – 6, शिपाई – 120, सिलिंग स्टाफ – 36 , माध्यम सम न्वयक – 1, उपजिल्हाधिकारी – 1, अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी – 8, राखीव अधिकारी-कर्मचारी 161, सीपीएफ स्टाफ – 26, एसआरपीएफ – 26, स्टेट पोलीस स्टाफ- 19

मतमोजणीच्या फेऱ्या

नगर मतदारसंघ – शेवगाव – 365 मतदान केंद्र, 26 फेऱ्या, राहुरी – 308 मतदान केंद्र, 22 फेऱ्या, पारनेर – 365 मतदान केंद्र, 26 फेऱ्या, नगर – 292 मतदान केंद्र, 21 फेऱ्या, श्रीगोंदा – 345 मतदान केंद्र, 25 फेऱ्या, कर्जत- जामखेड – 355 मतदान केंद्र, 26 फेऱ्या.

शिर्डी मतदारसंघ – अकोले- 308 मतदान केंद्र, 22 फेऱ्या, संगमनेर – 280 मतदान केंद्र, 20 फेऱ्या, शिर्डी – 273 मतदान केंद्र, 20 फेऱ्या, कोपरगाव – 270 मतदान केंद्र, 20 फेऱ्या, श्रीरामपूर – 310 मतदान केंद्र, 23 फेऱ्या, नेवासे – 269 मतदान केंद्र, 20 फेऱ्या.

आपली प्रतिक्रिया द्या