Lok Sabha 2019 तिकिटावर मोदींचा फोटो, 4 रेल्वे अधिकारी निलंबित

18

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

lok sabha election 2019 प्रचारादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाची करडी नजर आहे. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सोमवारी अनेक राजकीय नेतेमंडळींच्या प्रचारावर बंदी घातली आहे. तर रेल्वे तिकिटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो प्रसिद्ध केल्याप्रकरणी रेल्वेने 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तिकिटावर मोदी यांचा फोटो प्रसिद्ध केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने रेल्वे प्रशासनाला नोटीस पाठवली होती. त्यानंतर या चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त करत फटकारले होते. यामुळे खडबडून जागे झालेल्या आयोगाने नेतेमंडळीच्या प्रचारावर बंदी घातली. त्याआधी गंगा सतलज एक्सप्रेसच्या (13308) थर्ड एसी तिकिटांवर मोदींचा फोटो छापल्याप्रकरणी आयोगाने रेल्वेला नोटीस बजावली होती. या नोटीशीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने 4 अधिकाऱ्यांना कामावरून निलंबित केले आहे. बाराबांकी येथून वाराणसी येथे जाणाऱ्या सतलज एक्सप्रेसच्या थर्ड एसी तिकिटांवर पंतप्रधान आवास योजनेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात मोदींचा फोटोही होता. त्यावरून खळबळ उडाली होती. त्यानंतर या याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आली होती. त्याची दखल घेत रेल्वेने ही कारवाई केली आहे. तसेच जुने तिकीट रोल वापरण्यासही रेल्वेने मनाई केली आहे.

दरम्यान, याआधीही रेल्वेत निवडणूक प्रचार केल्याप्रकरणी वाद झाला होता. रेल्वेच्या तिकिटांवर मोदींचा फोटो प्रसिद्ध करण्याबरोबरच ‘मैं भी चौकीदार’ असे छापलेल्या कपात प्रवाशांना चहा दिला जात होता. त्याचीही निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वेने हे कप वापरणे बंद केले.

आपली प्रतिक्रिया द्या