फक्त काढा पिऊन 25 कोरोनाग्रस्त बरे झाले?

4087

अॅलोपॅथिक औषधांसोबतच आयुर्वेदीक औषधांच्या वापरामुळे कोरोनाग्रस्त बरे होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. देशाच्या विविध भागात आयुर्वेदाच्या आधारे कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. मात्र लखनऊमध्ये 25 रुग्ण हे फक्त आयुर्वेदीक काढ्यामुळे बरे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या काढ्याशिवाय रुग्णांना इतर कोणतंही औषध देण्यात आलं नव्हतं.

लखनऊमध्ये लोकबंधू रुग्णालय असून तिथले पंचकर्मतज्ज्ञ आदिल रईस यांनी सांगितले की गेल्या एक महिन्यांपासून या रुग्णांवर काढ्याचे उपचार सुरू होते. या काढ्यामध्ये सुंठ आणि आल्याचासह अन्य काही औषधींचा वापर करण्यात आला होता. कोरोनाग्रस्तांना दिवसातून दोव वेळा 50 मिलीलीटर काढा दिला जात होता. 5 दिवसांनंतर जेव्हा या रुग्णांची पुन्हा कोरोना चाचणी घेतली तेव्हा ते कोरोनामुक्त झाल्याचे दिसून आले होते. सात दिवसांनी त्यांना घरी पाठवण्यात आलं. या काढ्यासंदर्भात एक संशोधन करण्यात येत असून त्याद्वारे सगळा तपशील एकत्र केला जात आहे. या संशोधनामध्ये काढ्यामध्ये कोणकोणच्या औषधींचा वापर केला हे देखील नमूद करण्यात आलं आहे.

डॉ.आदिल यांनी म्हटलं आहे की आयुर्वेदामध्ये श्वसनाच्या विकारासंदर्भात अनेक औषधी आहेत. काढा बनवण्यासाठी यातल्या काही औषधींचा वापर करण्यात आला. आदिल यांनी सांगितलं की आयुर्वेदात बहुतांश आजार हे पोटाशी निगडीत असतात त्यामुळे पोटाच्या विकारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधींचाही या काढ्यामध्ये वापर करण्यात आला आहे. या काढ्यासोबतच पचायला सोपा आहार आणि प्यायला गरम पाणी देण्यात येत होतं. या संदर्भातील वृत्त हे नवभारत टाईम्सने प्रसिद्ध केलं आहे.

काही दिवसांपूर्वी आयुष मंत्रालयाने कोरोनाला मारू शकणाऱ्या चार आयुर्वेदिक औषधांच्या कॉम्बिनेशनच्या चाचणीला सुरुवात केली होती. केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली होती. आयुष मंत्रालय आणि काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रीसर्च (CSIR) संयुक्तरीत्या चार आयुर्वेदिक औषधांच्या कॉम्बिनेशनची चाचणी आठवडाभरात सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. अश्वगंधा, गुडुची, पिंपळी, ज्येष्ठमध ही आयुर्वेदिक औषधे या चाचणीमध्ये वापरली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मलेरियावर उपचारासाठी बनवण्यात आलेल्या ‘आयुष्य-64’ या आयुर्वेदिक गोळ्यांचाही वापर होणार असल्याचे ते केंद्रीय कोविड टास्क फोर्सने सांगितले होते. महाराष्ट्रातील मुंबई पुणे आणि नागपूर मधील रुग्णालयांमध्येही या चाचण्या होणार होत्या.

गुजरातमध्ये शेकडो पॉझिटिव्ह रुग्ण झाले निगेटिव्ह
आयुर्वेदिक उपचार घेतलेले गुजरातमधील शेकडो कोरोना पॉझिटिव रुग्णांचे अहवाल काही दिवसातच निगेटिव्ह आल्याचे दिसून आले होते अशी माहिती डॉक्टर परिक्षित शेवडे (एमडी, आयुर्वेद) यांनी दिली. गुजरातमध्ये सुरुवातीला 6 हजार 878 रुग्णांना आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधे दिली गेली होती. त्यातील 5102 जणांना आयुर्वेदीक तर 1688 जणांना होमिओपॅथिक औषधे दिली गेली. त्यातील केवळ 13 रुग्ण हे पॉझिटिव्ह आणि इतर सर्व निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनी औषधांचा कोर्स फक्त तीनच दिवस केला होता. या एकूण रुग्णांपैकी कोणाचीही प्रकृती चिंताजनक बनली नाही किंवा कोणीही दगावले गेले नाही असे डॉक्टर शेवडे यांनी सांगितले. अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या 213 रुग्णांना सात दिवसांचा आयुर्वेदिक औषधांचा कोर्स दिला होता. त्यातील 203 रुग्णांचे अहवाल सात दिवसानंतर निगेटिव्ह आले होते. गुजराच्या आरोग्य सचिव डॉक्टर जयंती रवी यांनी ही माहिती जाहीर पत्रकार परिषदेत दिली होती असे डॉक्टर शेवडे यांनी सांगितले. दिल्लीमध्ये डॉक्टर विदुला गुजरवार यांच्या अखत्यारित दाखल असलेल्या 105 रुग्णांवरही आयुर्वेदिक उपचार केले जात आहे. करोलबाग येथे युनानी तिपिया अँड आयुर्वेद कॉलेज येथे रुग्णांवर उपचार, अभ्यास केला जात असल्याची माहिती डॉक्टर शेवडे यांनी दिली

आपली प्रतिक्रिया द्या