Lok Sabha 2019 मंगल देशा पवित्र देशा युवकांच्या देशा !!

प्रसाद देशपांडे  <<prasaddeshpande05@gmail.com>>

साल २०१४ सालचा फेब्रुवारी महिना, ऊन तापायला अजुन सुरुवात झाली नव्हती तरी भारत देशातील वातावरण मात्र पार शिगेला पोहचलं होतं. सोशल मीडिया नावाचं एक अदभूत आणि तितकंच अचाट आणि एव्हाना बऱ्यापैकी रूळलेलं माध्यम आता निवडणुकीच्या धुळवडीसाठी सज्ज झालं होतं. महाविद्यालयीन किंवा माझ्यासारखे नुकतेच नोकरीला लागलेले हजारो लाखो तरुण ह्या सोशल मीडियावर व्यक्त व्हायला लागली होती. त्यांची राजकीय आणि सामाजिक मतं आताशा राजकारणी देखील गांभीर्याने घेत होते. ह्या आधी भारतातील युवक म्हणजे काय तर फक्त राजकारण्यांना चार शिव्या घालणार, मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळते म्हणुन मतदान न करता कुठेतरी भटकणार आणि परत राजकीय नेत्यांना “सब लोक चोर हैं” म्हणत शिव्या देऊन येरे माझ्या मागल्या करणार ही त्याची ओळख पार पुसली जाऊ लागली होती. मतदानाची गणितं टीव्हीवरच्या पॅनलपेक्षा फेसबुकवरच्या वॉल वर अधिक चांगल्यारितीने मांडली जाऊ लागली. ह्या सगळ्या भानगडीत कुठूनतरी भाजपचे तत्कालीन पंतप्रधानपदाचे उमेदवार श्री नरेंद्र मोदी ह्यांनी ह्याच तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी सोशल माध्यमांचा आधार घेतला आणि इतिहास घडला!! ३० वर्षांनी भारतात पूर्ण बहुमताचे सरकार आले. त्यात सगळ्यात मोठा वाटा हा पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांचा तर होताच पण २० ते ३० ह्या वयोगटातील लाखो तरुणांचा सुद्धा होता ज्यांच्या डोळ्यात नवीन भारताचं स्वप्नं होतं आणि ते प्रत्यक्षात आणायला त्यांना बदल हवा होता. आज २०१९ ची निवडणुक अवघी दोन आठवड्यांवर आलीय, गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले आहे. २०१४ च्या निवडणुकीत ह्या फ्रंटवर अगदीच पिछाडीवर असलेले सध्याचे विरोधी पक्ष देखील युवक केंद्रित राजकारणावर भर देतायत. पण ह्या सगळ्या रणधुमाळीत मागच्या लोकसभेला ज्यांनी चमत्कार घडविला होता त्या तरुण वर्गाच्या काय अपेक्षा आहेत?? त्यांचं काय म्हणणं आहे ह्यावर कुणी खरंच विचार केला का?? ह्याचा थोडक्यात राजकारणविरहित विचार आपण करूयात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवडणूक विषय संदर्भात एक सव्वा तासाचा जाहीर कार्यक्रम दिल्लीतील ताल कटोरा सभागृहात घेतला. त्याच्या राजकीय कोनाकडे आपण लक्ष नको देऊयात कारण तो लेखाचा विषय देखील नाहीय पण त्यात घडलेल्या २ बाबी मला एक २५ ते ३० वयोगटातील युवा म्हणुन प्रचंड भावल्या. त्यातली एक होती ती म्हणजे एका महाविद्यालयीन युवतीने मोदींना प्रश्न विचारतांना एक गुगली अशी टाकली की “सगळे लोक तुम्हाला त्यांच्या अपेक्षा सांगतात पण तुम्हाला एक राजकारणी म्हणुन आमच्याकडून काय अपेक्षा आहेत??” दुसरा प्रश्न तर चक्क बाऊन्सर होता अरुणाचल प्रदेश मधील एका युवतीने “मी माझ्या आयुष्यातील पहिलं मतदान येणाऱ्या लोकसभेत करणार आहे त्यामुळे कृपया तुम्ही सांगाल का की मी तुमच्या पक्षाला का मतदान करावे?? तुमच्या पक्षाची येणाऱ्या ५ वर्षांसाठी कोणती धोरणं राहणार आहेत??” हे दोन्ही प्रश्न मला प्रचंड भावले कारण त्यातून आजचा युवा नेमका कसा विचार करतो ह्याचं प्रतिबिंब पडत होतं. राजकारण्यांना निव्वळ शिव्या देणारे, त्यांच्याकडूनच अपेक्षा ठेवणारे युवा ते थेट आमच्याकडून देखील काय अपेक्षा आहेत हा प्रवास खूप समाधान देणारा आहे. देशाच्या पंतप्रधानाला ‘मुद्द्याचं काय ते बोला‘ असं बिनधास्तपणे सांगणारी ती युवती आजच्या युवकांचं प्रतिनिधित्व करते. निवडणुक आयोगाच्या आकडेवारी नुसार २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण ९० कोटी मतदार मतदानाचा अधिकार बजावु शकतील. त्यातले ९ टक्के म्हणजे ८.४ कोटी लोक हे त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा मतदान करतील आणि त्यातले १.५ कोटी मतदार हे १८ ते १९ ह्या वयोगटातील आहे!! इतकी लोकसंख्या तर काही देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा देखील अधिक आहे!! इतक्या मोठ्या संख्येतील शहरी आणि ग्रामीण मतदार कितीतरी अपेक्षा ह्या राजकारणी आणि राजकीय पक्षांपासून ठेवून असतील नाही??

काही दृकश्राव्य (इलेक्ट्रॉनिक) माध्यमांनी तसेच काही राष्ट्रीय मासिकांनी ह्या युवा मतदारांचा सर्वे केला त्याची आकडेवारी मोठी मजेशीर आहे. आकडेवारीच्या तांत्रिक बाजूस आपण जाणार नाही पण त्याचं विश्लेषण आपण नक्की करूयात!! ज्या अपेक्षा ह्या सर्व्हेत व्यक्त झाल्या त्यात ढोबळमानाने काही कॉमन अपेक्षा अशा होत्या ज्या ह्या आधीच्या पिढीतील युवकांच्या देखील होत्या. त्या कितपत पूर्ण झाल्या हा भाग अलाहिदा. पण त्या होत्या हे मात्र खरं. शहरातील बहुतांश युवा मतदारांच्या अपेक्षा ह्या रोजगार उपलब्धता, शिक्षणाच्या संधी, शहरातील उत्तम राहणीमान ह्या आहेत, तर त्याच वेळी ग्रामीण भागातील युवकांच्या अपेक्षा ह्या शेतीमालाला योग्य भाव, रस्ते, वीज आणि पाणी ह्यांची आपूर्ती आणि शिक्षण/नोकरीच्या संधी. दोन अपेक्षा ह्या शहर आणि ग्रामीण ह्या दोन्ही भागातील युवकांनी व्यक्त केल्या त्या म्हणजे भ्रष्टाचार मुक्त आणि लालफीतशाहीत न अडकणारे वेगवान सरकार, आणि आतंकवाद्यांशी कणखरपणे इट का जवाब पत्थर से देणारे सरकार!! ह्या दोन अपेक्षा २०१४ च्या सुमारास देखील होत्या का?? भ्रष्टाचार मुक्त ही अपेक्षा निश्चित होती पण वेगवान आणि इट का जवाब पत्थर से देणारे सरकार ह्या निदान माझ्यासाठी तरी नवीन अपेक्षा होत्या. कदाचित मोदींच्या ५ वर्षांच्या कार्यकाळानंतर ह्या अपेक्षा नव्याने आल्या असतील, पण वेगवान लालफितशाही मुक्त सरकार, आणि दहशतवाद्यांना जशाच तसे उत्तर देणारे सरकार ह्या गोष्टी भारतीय राजकारण्यांना नवीन नाही. मग प्रश्न हा पडतो की मग आजच्या युवकांच्या ह्या मागण्यांमध्ये नेमकं काय वेगळं आहे?? वेगळी आहे ती गृहीतके. आजचा १८ ते २३ वयोगटातील युवा ‘वचनेषु किं दरिद्रताम’ ह्या उक्तीवर चालत नाही तो चालतो ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर‘!! त्याचा फॉर्म्युला सरळ आहे कारण त्याने त्याच्या कळू लागलेल्या वयात म्हणजे २०१४ ते २०१९ ह्या ५ वर्षात जी काही सरकारी कामं त्याच्या डोळ्यांदेखत झाली त्याला पॅरामिटर ठेवून त्यानुसार त्याच्या अपेक्षा सेट केल्या आहेत. ६० वर्षांपूर्वी नेहरूंनी काय चुका केल्या किंवा काय उपलब्धी मिळविल्या ह्याच्याशी त्याला काहीही घेणेदेणे नाही तो त्याचं राजकीय आकलन सध्याच्या रिझल्टस वर करणार आहे. म्हणुन जेंव्हा त्याच्या डोळ्यासमोर गेल्या चार वर्षात जी काही विकास कामे झाली जसे की हायवे, मेट्रो, फ्लायओव्हर चे पूर्ण होणारे प्रोजेक्ट्स हे तो बघतो तेंव्हा त्याला प्रशासकीय कामाचा वेग हा इतकाच असतो हेच चित्र त्याच्या समोर असेल ना?? किंवा ग्रामीण भागात अगदी सुदूर क्षेत्रात आलेली वीज, बांधले गेलेले शौचालय, किंवा गावागावात आलेली इंटरनेट क्रांती, स्वच्छता, घराघरांत आलेले गॅस कनेक्शन ह्या गोष्टी ज्या त्याला दिसतायत तो त्याच डोळ्यासमोर ठेवून मत बनवेल, ज्या गोष्टी सध्याच्या सरकारने आश्वासनं देऊन पूर्ण केल्या नाहीत त्या गोष्टींची देखील यादी आजचा तरुण बनवितो. एकूण काय pros अँड cons ची यादी बनविली की त्याचा त्याच्यापुरता निर्णय झालेला असतो. जुन्या राजकीय गृहीतकांवर आजचा तरुण चालत नाही त्यामुळे ‘चौकीदार चोर है‘ किंवा ‘मैं भी चौकीदार’ ह्या गदारोळात कुठे तरी स्वतः विचार करतो आणि त्याच्या बुद्धीला पटेल रुचेल असा व्यक्त होतो.

२०१४ च्या निवडणुकीनंतर एक मुख्य ओरड अशी झाली होती की भारतातल्या निवडणुका अमेरिकन अध्यक्षीय पदाच्या धर्तीवर व्हायला लागल्या आहेत. अमेरिकेत अध्यक्षीय प्रणाली आहे तिथे आधी राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर होतो, आणि मग तिथले हाऊस रिप्रेझेन्टेटिव्ह (तिथले खासदार) निवडले जातात. भारतात आपण आधी खासदार निवडतो आणि मग निवडलेले खासदार त्यांचा नेता म्हणजेच पंतप्रधान निवडतात. पण २०१४ नंतर केंद्र असो वा राज्य बहुतांशी भागात कुठल्या ना कुठल्या पक्षाने त्यांचा नेता जाहीर केला आहे आणि मग त्या नेत्याच्या नावावर लोकांना मतं मागितली आहेत. बऱ्याचवेळा हा प्रयोग सफल झाला आहे. ह्या फॉर्म्युल्या मागे देखील भारतातील युवा शक्ती मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे. त्यांच्या मनात बहुतांशी देशाचा पंतप्रधान किंवा राज्याचा मुख्यमंत्री कोण व्हावा ही गोष्ट स्पष्ट असते, कदाचित हा देखील एक परिणाम असेल की त्यांच्या त्या आवडीच्या नेत्याला पंतप्रधान/मुख्यमंत्री हे पद मिळावं म्हणुनही युवक मतदान करतात, त्यामुळे मतदानाची टक्केवारी देखील वाढते. ग्रामीण भागात ही क्रेज शहरी भागापेक्षा किंचित अधिक आहे. त्यात युवकांना दोष देता येणार नाही कारण शेवटी ते देखील ह्याच लोकशाहीचा एक हिस्सा आहेत.

आपल्यापैकी अनेक लोक आज सोशल माध्यमांवर व्यक्त केलेले विचार वाचतात किंवा स्वतः व्यक्त होतात. माझे काही मित्र त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच मतदान करणार असतील. पहिलं प्रेम, पहिला चोरून बघितलेला चित्रपट, पहिल्या पगारात केलेली पार्टी, पहिला विमान प्रवास ह्या गोष्टी आयुष्यात खूप खास असतात कारण कुठल्याही गोष्टीची पहिली वेळ ही आयुष्यात एकदाच येते. तेंव्हा तुमचं पहिलं वहिलं मतदान देखील सेलिब्रेट करा. तुमच्या बुद्धीला पटेल, रुचेल आणि तुम्हाला वाटतं की जो ह्या भारताला समर्थपणे चालवू शकेल असा नेता, खासदार तुम्ही निवडायला छान मस्तपैकी तयार होऊन मतदान केंद्रावर जा, मत द्या आणि अभिमानाने मत दिलेल्या बोटाचा सेल्फी घ्या आणि सोशल मीडियावर मिरवा. तुमच्याकडे विचार करायला फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत बरं!! तुमचं एक मत भारताचं, म्हणजेच पर्यायाने तुमचं भविष्य ठरविणार आहे. तेंव्हा विचार करा your time starts now!!